- 2394 नवीन बाधित
- पाच हजाराहून अधिक रुग्ण रुग्णालयात
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आज 2394 नवीन रुग्णांची भर पडली. तर तब्बल 28 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरात 1 लाख 65 हजार 367 जणांना करोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये 5 हजार 19 रुग्णांवर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 2239 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 155 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 28 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 19 व शहराबाहेरील 9 जणांचा समावेश आहे. शहरातील चिंचवड, आज्ञकुर्डी, चिखली, थेरगाव, पिंपरी, वाक़ड, दिघी, निगडी, सांगवी येथील 19 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील चंदननगर, खडकी, डेक्कन, बाणेर, हांडेवाडी, कात्रज, हिंजवडी, पुणे, केंदूर येथील 9 जणांचा समावेश आहे.
दिवसभरामध्ये 2261 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 37 हजार 924 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 8647 संशयित रुग्णांची महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 4938 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 5019 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 20,266 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 25,285 इतकी आहे.