मुंबई : मुंबई शहरातील सर्वात दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावीत करोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. अशातच रविवारी धारावीत कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आल्याने या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
त्यामुळे आता धारावीतील एकूण करोनाबाधितांची संख्या 138 वर गेली आहे. करोनामुळे आतापर्यंत धारावीतील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या 20 नव्या रुग्णांमध्ये फातिमा चाळीतील सहा जणांचा समावेश आहे. यापूर्वी शनिवारी कल्याणवाडीमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता धारावी परिसरातच कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तयार होत असल्याची भीती आहे.