पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी करोना बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. त्यामध्ये दिवसभरात 1,696 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर नव्याने 1,637 बाधित सापडले. दरम्यान, करोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या 24 तासांत 58 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहर-41, तर अन्य जिल्ह्यांतील 17 जणांचा समावेश आहे. शहरात दररोज 40 ते 46च्या आसपास करोना मृत्यू होत असल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रविवारी (दि. 27) दिवसभरात 5,614 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 6 लाख 12 हजार 208 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 42 हजार 136 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले.
त्यातील 1 लाख 21 हजार 176 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात सध्या 17 हजार 587 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 940 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 520 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 420 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.