मुंबई – राज्यात आणखी 169 पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.
मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता 22 हजार 629 वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले (ऍक्टिव्ह केस) 3 हजार 190 जण, बरे झालेले 19 हजार 198 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 241 जणांचा समावेश आहे.
राज्यातील एकूण 22 हजार 629 करोनाबाधित पोलिसांमध्ये 2,473 अधिकारी व 20,156 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (ऍक्टिव्ह) 3,190 पोलिसांमध्ये 397 अधिकारी व 2,793 कर्मचारी आहेत. करोनातून बरे झालेल्या 19,198 पोलिसांमध्ये 2,52 अधिकारी व 17,146 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.