सहा जवानांचे अहवाल बाकी; 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह
दौंड (प्रतिनिधी) – येथील राज्य राखीव दलातील आणखी 15 जवानांचा करोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संग्राम डांगे यांनी दिली. दौंड तालुक्यात एकूण करोनाग्रस्तांची संख्या 25 झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान राज्यातील मुंबई येथे बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव बल गट क्र. 7च्या 95 जवानांची एक तुकडी काल (गुरुवारी) दौंड येथे दाखल झाली होती. या सर्व जवानांची करोना विषाणूची तपासणी केली असता, यातील 15 जवानांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सहा जवानांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी असून 74 जवानांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यापूर्वी दौंड तालुक्यात दहिटणे येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तर राज्य राखीव दलातील 24 जवानांना करोनाची लागण झाल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या सर्व जवानांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.