शेवगाव : शेवगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव रविवारी दि. ८ डिसेंबर रोजी होत असून, यानिमित्ताने शनिवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीच्यावतीने माजी सरपंच सतीश पाटील लांडे यांनी दिली.
चंपाषष्टीच्या नंतरच्या रविवारी येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची व त्यानंतर पंधरवाड्यानंतर येणाऱ्या रविवारी श्री सोनामिया देवस्थानच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा आहे. श्री खंडोबा देवस्थानाच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप शुक्रवारी हभप राम महाराज उदागे यांच्या कात्याच्या कीर्तनाने झाला. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने खंडोबा मंदिराच्या परिसरात विविध प्रकारचे रहाट पाळणे, विद्युत रेल्वे, झिगझॅग, मौतका कुवा आदी करमणुकीचे खेळ दाखल झाले आहेत.
त्यामुळे परिसराला डिस्ने लँडचे स्वरूप आले आहे.शनिवारी पैठण येथून पायी कावडीने आणलेल्या गंगाजलाने श्री खंडोबा देवास गंगास्नान व अभिषेक घालून यात्रेस प्रारंभ होणार आहे. रात्री छबीना मिरवणूक निघणार आहे. यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी माजी सरपंच लांडे यांचेसह हरिष भारदे, गणपत कर्डिले, गणेश कोरडे, लक्ष्मण भिसे, एजाज काझी, शिवाजी तोतरे, राहूल मगरे, वजीर पठाण, प्रताप फडके, सलीम मुजावर, उमर शेख, कैलास तिजोरे, राजेंद्र मगर, अनिल इंगळे, मच्छिन्द्र कोरडे आदि प्रयत्नशिल आहे.
दरम्यान, या वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या मुख्य रस्त्यावर ठायीठायी असलेले लहान-मोठे खड्डे बुजवावेत , मंदिर परिसराची स्वच्छता करावी, यात्रेनिमित्त रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभारण्यात येणाऱ्या दुकानामध्ये व्यवस्थित अंतर ठेवण्यात यावे, गर्दीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. बाहेरगावाहून येणाऱ्या छोट्या- मोठया व्यावसायिकांसाठी फिरते शौचालय सुविधा उपलब्ध करावी आदी मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे , वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रितम गर्जे, अमोल घोलप, काँग्रेस ओबीसी सेलचे समद काझी यांनी नगर परिषद व पोलिस प्रशासनाला दिले.