लखनौ: एका शिक्षिकेचे अवघ्या 13 महिन्यांमधील उत्पन्न तब्बल 1 कोटी रूपयांच्या घरात असल्याच्या बातमीने सध्या उत्तरप्रदेशात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, त्या बातमीची अद्याप पुष्टी होऊ शकली नसल्याची सारवासारव राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशात विविध ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या शाळा आहेत. त्या विद्यालयाच्या 25 शाळांमध्ये एक शिक्षिका विज्ञान विषय शिकवते. त्यातून ती भरभक्कम कमाई करत असल्याची नुकतीच प्रसिद्ध झालेली बातमी मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. साहजिकच, राज्य सरकारला त्या बातमीची दखल घ्यावी लागली. त्यातून शिक्षण विभागाने चौकशीचा आदेश दिला.
शिक्षक किंवा शिक्षिका छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी कार्यरत असेल तर कठोर कारवाई केली जाईल. चौकशीतून तूर्त तरी बातमीची पुष्टी होऊ शकलेली नाही. संबंधित शिक्षिकेच्या बॅंक खात्यात अतिरिक्त पगाराची रक्कम जमा झाल्याचे आढळलेले नाही, असे उत्तरप्रदेशच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. संबंधित बालिका विद्यालयाच्या शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने होते. त्यांना दरमहा 30 हजार रूपये पगार दिला जातो.