मंचर/पारगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दत्तात्रयनगर-पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 25 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 25) कारखान्याचे संस्थापक संचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.
पारगाव येथे भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सभा शनिवारी (दि. 25) दुपारी तीन वाजता होणार आहे. या सभेमध्ये मागील अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कामकाज वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेच्या 2020-21 वर्षासाठीचा कामकाज अहवाल, नफा-तोटाप त्रक आणि 31 मार्च 2021 रोजीचा ताळेबंद स्वीकारणे,
तसेच मंजूर करणे, 2020-21 वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमा-खर्चास मान्यता देणे, 2021-22 वर्षासाठी संचालक मंडळाने सादर केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाची, 2020-21 आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, 2019-20 वर्षाचा लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे,
2021-22 वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांच्या नेमणुकीस, भाग विकास निधी विनियोगास, स्क्रॅप मटेरियल विक्रीस, ऊस बिलातून कपात केलेल्या ठेवीची रक्कम परत करण्यास मुदतवाढ देणे, महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये उपविधीमध्ये दुरुस्ती करून भागाची दर्शनी किंमत 10 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये करणे,
स्थापत्य भांडवली कामाच्या खर्चास, भीमाशंकर शिक्षण संस्थेस कर्ज उभारणीसाठी बॅंकेस हमी देण्यास मान्यता देणे आदी विषयी चर्चा होणार आहे. सभासदांनी सभेच्या नोटीसमध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर अथवा क्यूआर कोडवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.