सहा महिन्यांत “इएलयू’ पूर्ण करणार विकास आराखड्याचे काम हाती
जुन्या डीपीतील वादामुळे घेतला निर्णय
महापालिका प्रशासनाकडून जुन्या हद्दीचा सुधारित प्रारूप विकास आराखडा करताना; मागीलवेळी हा “इएलयु’ जाहीर केला नव्हता. त्यावेळी पालिकेकडून थेट “पीएलयु’ जाहीर करून त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावरून मोठा गोंधळ झाला होता. ही बाब लक्षात घेऊन या डीपीबाबतही होणारे वाद टाळण्यासाठी प्रशासनाने हा “इएलयु’ केवळ माहितीसाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी या गावांच्या प्रत्यक्ष जागा वापर (इएलयू)चे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात आले असून हा “इएलयु’ नागरिकांसाठी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या 2007 ते 2027 च्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याचा “इएलयु’ अर्धवट असल्याने जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून केवळ नागरिकांच्या माहितीसाठी हा “इएलयु’ जाहीर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
ऑक्टोबर 2017 मध्ये महापालिकेच्या हद्दीत 11 नवीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने इरादा जाहीर केला असून त्यानंतर आता प्रत्यक्ष जागा वापराचे सर्वेक्षण हाती घेतले आहे.
मात्र, या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याने तसेच नवीन बांधकामे सुरू असल्याने, प्रत्यक्ष जागा वापराची माहिती संकलित करताना पालिकेस चांगलीच कसरत करावी लागत आहे. याच “इएलयु’च्या माहितीवरून पालिकेकडून विकास आराखड्यातील आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे हा “इएलयु’ नागरिकांना माहितीसाठी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.