पुणे – भारताने कांदा निर्यातबंदी उठविल्याची अधिसूचना जारी केल्याची माहिती जागतिक बाजारपेठेत धडकताच, कांद्याच्या दराबाबत चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय कांद्याची किती टन निर्यात होऊ शखणार आहे, याची चौकशी निर्यातदारांकडे सुरू झाली आहे निर्यातबंदी घोषणेमुळे कांदा उत्पादक पट्ट्यात बाजारभावातील घसरण थांबून क्विंटलमागे सरासरी 100 रुपयांनी वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला दीड लाख क्विंटलपर्यंत आवक होणाऱ्या कांद्याची पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत विक्री सुरू राहील. याच आसपास उन्हाळ कांद्याची आवक वाढण्यास सुरवात होईल. त्यामुळे निर्यातदारांचा पुण्यातील उन्हाळी कांदा संपल्यानंतर नाशिकच्या कांद्याकडे कल वाढण्यास सुरवात होणार आहे. एप्रिल आणि मेमध्ये शेतकरी व व्यापारी उन्हाळा कांद्याची साठवणूक करण्यास सुरवात करतात. ही सारी परिस्थिती पाहता, निर्यातीसाठी 15 ते 16 रुपये किलो भावाने कांदा उपलब्ध होईल आणि मागणीएवढा कांदा पाठविण्यात येईल, असे निर्यातदारांनी चौकशी करणाऱ्या आयातदार व्यापाऱ्यांना सांगितले.
पुणे जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची आवक चांगली
लाल कांद्यासोबत जिल्ह्यातील बाजारपेठेत उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे. उन्हाळी कांद्याची आवक कमी असून, त्यास साधारण लाल कांद्याच्या आसपास भाव मिळत आहे. उन्हाळी कांद्याला क्विंटलला पिंपळगावमध्ये 1 हजार 751, तर कळवणमध्ये 1 हजार 775 रुपये भाव मिळाला. सद्यःस्थितीत पुणे भागात उन्हाळी कांद्याची आवक चांगली असल्याने लाल कांद्याच्या जोडीला पुण्यातील उन्हाळी कांद्याच्या खरेदीकडे निर्यातदारांचा सुरवातीला कल राहणार आहे. पुण्यात उन्हाळी कांद्याचा क्विंटलचा भाव बाराशे रुपये असा आहे.
या देशांमध्ये कांदा निर्यातीची शक्यता
भारतातून मोठ्या आकाराचा कांदा आयात करण्यासाठी श्रीलंका सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतानेदेखील कांदापुरवठा करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. प्रतिकुल हवामानामुळे कांदा उत्पादनाला फटका बसला असताना सुद्धा भारताने कांदा आयातीला सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेत मोठ्या कांद्याचे दर 135 ते 140 रुपये प्रतिकिलोपर्यंत असून कांद्याच्या दैनंदिन पुरवठ्यात घट होत आहे. श्रीलंकेची कांद्याची वार्षिक गरज सुमारे 2 लाख 50 हजार टन आहे. परंतु, देशात केवळ 25 हजार मेट्रिक टन उत्पादन होते. याशिवाय सिंगापूर, मलेशिया, दुबई, कुवेत, ओमान, मस्कतमधूनदेखील कांद्याची उपलब्धता व दराबाबत विचारणा सुरू झाली आहे.