सनी लिओनने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. श्रीजीत विजयनच्या “शेरो’ या तमिळ थ्रिलर सिनेमात ती दिसणार आहे. याशिवाय विक्रम भट्ट यांच्या “अनामिका’ या वेब सीरिजमध्येही ती दिसणार आहे. या वेब सीरिजचे शूटिंग नुकतेच संपले आहे.
आता त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात होणार आहे. ही वेब सीरिज 10 भागांची असणार आहे. या दोन प्रोजेक्टमुळे आपले हे वर्ष मस्त जाणार आहे, असे ती म्हणाली. या वर्षात आपण सर्वजण घरामध्येच अडकून पडलो होतो.
या काळात या प्रोजेक्टची तयारी चांगल्या प्रकारे करता आली. त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी खरोखर “वर्किंग इअर’ होते, असे सनी म्हणाली. “शेरो’चा डायरेक्टर विजयन यांनीच या सिनेमाची कथा लिहिली आहे.
त्यांनी यापूर्वी तमिळमधील आणखीन 2-3 सिनेमांचे डायरेक्शन केलेले आहे. “शेरो’जरी तमिळमध्ये रिलीज होणार असला तरी हिंदी प्रेक्षकांना नाराज होण्याचे काहीही कारण नाही.
कारण हा सिनेमा एकाचवेळी तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे “अनामिका’मध्ये ती चक्क मारेकरी म्हणून दिसणार आहे. तिला या वेब सीरिजमध्ये विरुद्ध बाजूच्या गॅंगला संपवण्याचे काम करायचे आहे.