महाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज होणार घोषणा

निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ऑक्‍टोबरमध्ये दोन्ही राज्यात निवडणुका सुरू होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार असून आजपासून दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीची तारीख जाहीर होताच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी झाल्यानंतर दोन्ही राज्यातील सरकारांना कोणतीही नवीन घोषणा करता येणार नाही किंवा कोणतीही नवीन योजना राबवण्याचे अधिकार त्यांना नसणार आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे मतदारांना लुबाडण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी सरकारला आपला अधिकार वापरण्यास मनाई असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणामधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागाच्या 110 आयआरएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या दोन राज्यांमधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान काळ्या पैशांचा वापर आणि इतर बेकायदेशीर विनंत्यांचा तपास करण्याचे काम या निरीक्षकांना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यापुर्वीच सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 सप्टेंबर रोजी या अधिकाऱ्यांना बोलावले असून, त्यांना यासंदर्भात कळवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडता यावे यासाठी त्यांना पदभारमुक्त करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here