नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया येथील गोळीबाराच्या घटनेनंतर शाहिन बाग परिसरात एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली. हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. ज्यावेळी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले तेव्हा ‘हिंदू राष्ट्र जिंदाबाद’, ‘या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाचही नाही, अशी घोषणाबाजी केल्याचे समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा तरुण पूर्व दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात मागील एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून शाहिन बाग येथे आंदोलन सुरु आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका तरुणाने याठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही दुखापतग्रस्त झालेला नाही.
यापूर्वी एका स्थानिक ठेकेदाराने बंदुकीचा धाक दाखवून आंदोलन मागे घेण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर गुरुवारी एका तरुणाने जामिया परिसरात सुधारित नागरिकत्वाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गोळी झाडल्याचा प्रकार घडला होता. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता.