पिफच्या “वर्ल्ड कॉम्पिटिशन’मधील चित्रपटांची घोषणा

पुणे – “पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील “वर्ल्ड कॉम्पिटिशन’ आणि भारतीय चित्रपट या विभागांतील चित्रपटांची नावे सोमवारी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली.

यावेळी महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्‍वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे, अभिजित रणदिवे, एमआयटीचे अमित त्यागी आदी उपस्थित होते.

महोत्सवासाठी यावर्षी 60 देशांमधून तब्बल 1,900 चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक 191 चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवादरम्यान चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. त्यापैकी भारतातील “मार्केट’ या चित्रपटासह झेक रिपब्लिक, लातव्हिया, रशिया, ब्राझील, स्लोव्हाकिया, युक्रेन, इंडोनेशिया, मलेशिया, फ्रान्स, चीन, जर्मनी, हंगेरी, पोलंड, ट्युनिशिया, कतार, ग्रीस या देशांतील द ह्युमरिस्ट, मारिगेला, द पेंटेड बर्ड, द सायन्स ऑफ फिक्‍शन, मोजाइक पोर्टेट, द टीचर, टॉल टेल्स, सुपरनोव्हा, अ सन, लीसाज टेल, होमवर्ड, बीनपोल, अडल्टस्‌ इन द रूम हे चित्रपट रसिकांना पाहता येतील.

यंदा पिफमध्ये “अ नाईट, अ डे’, “निर्वाणा इन’, “ऍक्‍झॉन’, “केडी’, “विडोज ऑफ सायलेन्स’, “द शॅडो ऑफ ऑथेल्लो’, “द होम ऍन्ड द वर्ल्ड टुडे’, “ट्रीज अंडर द सन’, “द सीड’, “सिंगल स्लीपर साईज’ आदी भारतीय चित्रपट असणार आहेत.

असा असेल “पिफ फोरम’
“पिफ फोरम’मध्ये ख्यातनाम चित्रपट निर्माते, लेखक आर. बाल्की यांचे “विजय तेंडुलकर मेमोरियल लेक्‍चर’अंतर्गत संवाद साधणार आहेत. यासह “चित्रपट साक्षरता’, “ओटीटी प्लॅटफॉर्मस्‌ ऍन्ड सक्‍सेसफुल मार्केटिंग ऑफ फिल्म्स’, “फिल्म इन्शुरन्स’, “साऊंड’, “ऍक्‍टिंग’, “मेकअप डिझायनर क्रिएटिंग ऍन इल्युजन’ या विषयांवर आधारित संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.