पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली. संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने त्यानुसार स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासाची तयारी करणे शक्य होत आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारीला, महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल रोजी, राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी, राज्य सेवा पूर्व परीक्षा 19 जून रोजी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबरला आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 10 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.