पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता कृषीची पदे समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा आणि उमेदवारांच्या मानसिकतेसोबत न खेळता तात्काळ पूर्वपरीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
एमपीएससीने २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा रद्द करून पंधरा दिवस उलटले आहेत, तरीदेखील परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे.
काही उमेदवारांना आयोगाच्या अशा दिरंगाईविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, तर काही उमेदवारांनी सोमवारी ‘टि्वटर’वर मोहीम राबवत आयोगाने तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आयोगाचे लक्ष वेधले आहे. आयोगाने पूर्वपरीक्षेची तारीख तात्काळ घोषित करून उमेदवारांना आश्वासित करावे.
आर्थिक व अभ्यासाचे नियोजन करताना उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा गट ‘ब’ व गट ‘क’ ची जाहिरात देखील मागील आठ महिन्यांपासून प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे उमेदवार चिंतेत आहेत. त्यामुळे ही जाहिरात देखील लवकर प्रसिद्ध करावी, अशी मागणीही कडू यांनी केली आहे.