दौंड -दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुक्यात करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व विविध मागण्या संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती कुल यांनी दिली.
आमदार कुल म्हणाले की, करोनाचा सामना करत असताना व संचारबंदीमुळे गोर गरीब जनता, कामगार, कष्टकरी, मजूर व हातावर पोट असलेल्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांचा समस्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधत योग्य निर्णय घेण्यात यावे. पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागावरील ताण कमी करावा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली.
करोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या विविध उपाय योजनांसंदर्भात माहिती दिली. राज्यपालांशी यावेळी जलसंपदा, अवयवदान, वन विभाग आदी विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.