संकटाला जर संधी मानली तर त्यातून बरेच काही चांगले हाती लागू शकते, असा संदेश आजपर्यंत अनेक वेळा व्यवस्थापन गुरुंनी दिला आहे. त्या बाबतची अनेक उदाहरणेही दिली जातात व्यवस्थापन महाविद्यालयात शिकण्यासाठी वर्गामध्ये दिली जाणारी ही उदाहरणे चपखल आणि पटणारी असली तरी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन आणि करोना महामारी ने संकटातच संधी मानण्याचे एक मोठे उदाहरण समोर ठेवले आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये करोनाच्या महामारीने जगातील सर्वच देशांना आर्थिक संकटात टाकले असले तरी आणि बहुतेक अर्थव्यवस्था डबघाईस आल्या असल्या तरी याच कालावधीत या संकटाला संधी मानून आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती करणाऱ्यांची उदाहरणेही काही कमी नाहीत.
ज्याप्रमाणे लॉकडाऊनच्या नियमांमुळे समाजाला एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागली त्याचप्रमाणे या काळात उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या आतापर्यंत ज्या मार्गांचा आणि उपायांचा विचारही केला नव्हता असे मार्ग आणि उपायही अमलात आणण्याचे काम अनेकांकडून झाले.
तंत्रज्ञानाचा वापर
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला डिजिटल माध्यमांचा वापर गेल्या वर्षभरामध्ये जेवढा झाला तेवढा गेल्या अनेक वर्षांमध्ये झाला नव्हता अशी ही आकडेवारी सांगते वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन हे दोन हे दोन शब्द या कालावधीमध्ये एवढे प्रचलित झाले की, देशाच्या आर्थिक आणि व्यापारी जीवनशैलीचे ते अविभाज्य भाग बनून राहिले आहेत घरबसल्या काम करावे लागणार असल्याने डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर या कालावधीमध्ये झाला इंटरनेट सेवेचा प्रसार आणि प्रचार वाढला.
आरोग्यसेवा
महामारीच्या या संकटाला संधी मानण्याचे सर्वात मोठे काम आरोग्य क्षेत्राने केले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही ज्या वस्तूंचा वापर मर्यादित प्रमाणात केला जात होता त्या वस्तू आता सर्रास आणि खूपच मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या मास्क, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, हॅन्ड ग्लोव्हज या वस्तूंची उलाढाल गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.
भारतात मार्च महिन्याच्या अखेरीस लोक डाऊन जाहीर झाले होते तेव्हा देशातील मास्कची उलाढाल साधारण दोनशे कोटी रुपयांची होती यानंतर महिनाभराच्या कालावधीतच ही उलाढाल पाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे आकडे सांगतात अर्थात संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले एन4 प्रकारातील मास्क उत्पादनाची ही उलाढाल आहे त्याशैवाय गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये स्थानिक पातळीवरही मोठ्याप्रमाणावर मास्क तयार करण्याची प्रक्रिया वाढल्याने त्या उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
हेच उदाहरण सॅनिटायझर बाबत देता येते देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत त्याची उलाढाल दहा कोटी वरून 43 कोटी रुपयांपर्यंत वाढली गेल्या वर्षभराचा कालावधीमध्ये देशात सॅनिटायझर निर्माण करणाऱ्या नवीन 152 कंपन्या स्थापन झाल्या सानिटीझरची मागणी तब्बल 77 टक्के वाढ झाली.
ऑक्सीमिटर विविध प्रकारचे हॅन्ड ग्लोव्हज या प्रकाराबाबतही अशाच सकारात्मक घटना घडल्या ऑनलाईन माध्यमातून घरपोच औषधांचा पुरवठा करणाऱ्या फार्मासी किंवा वन एमजी या सारख्या कंपन्यांची उलाढाल ही या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते भारताने लसीकरणाच्या कामातही लक्षणीय प्रगती केली.
घरपोच सेवा
घरपोच सेवा देण्याचा एक नवीन ट्रेंड या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित झाला ही आणखीन एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल आत्तापर्यंत आपल्या परिसरातील किराणा दुकानदाराकडे यादी टाकून स्वतः सामान आणणारा सामान्य नागरिक आता व्हाट्सअपवर यादी टाकून सामान घरपोच मागू लागला.
भाजीवाले ही तुमच्या दारात घरपोच भाजी आणू लागले आत्तापर्यंत फक्त खाद्यपदार्थ आणि फास्ट फूड यासाठी जी घरपोच सेवा उपलब्ध होती ती घरपोच सेवा आता इतर कारणांसाठीही उपलब्ध होऊ लागली आहे त्यासाठी गेल्या काही कालावधीमध्ये अनेक प्रकारचे ऍप्स विकसित झाले आहेत आता लॉकडाऊनचे नियम मोठ्या प्रमाणावर शिथिल झाले असूनही लोक घरपोच सेवेचा लाभ तेवढ्याच प्रमाणात घेत आहेत, हीसुद्धा सकारात्मक बाब म्हणावी लागेल
शैक्षणिक क्षेत्र
देशातील शैक्षणिक क्षेत्रालाही एक ऑनलाईन शिस्त लावण्याचे काम या कालावधीमध्ये झाले विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणे हि वेगळी प्रथा या कालावधीमध्ये सुरू झाली भारतीय लोकांच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असणारी टीव्ही इंडस्ट्री ही या कालावधीमध्ये वेगळे रूप घेऊन समोर आली. दूरदर्शनचे कोणतेही चॅनेल न पाहणाऱ्या भारतीय नागरिकाला रामायण आणि महाभारत या सारख्या महा मालिकांमुळे दूरदर्शनकडे वळावे लागले आणि केवळ महिन्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दूरदर्शनने टीआरपीचा वेगळा टप्पा गाठल्याचे दिसून आले.
या कालावधीत वेबसीरिज लोकप्रिय झाल्या. आपल्या मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर या मनोरंजनाचा आनंद घेणे शक्य असल्याने अनेक निर्मात्यांनी वेब सिरीज रिलीज केल्या चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपटही ऑनलाइन रिलीज केले देशात सध्या अनलॉक चे टप्पे सुरू असले तरी चित्रपटगृहांकडे चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे कारण लोकांना आता घरपोच मनोरंजनही उपलब्ध होत आहे.
थोडक्यात काय करोना महामारीच्या संकटामुळे आणि लॉकडाउनच्या नियंत्रणामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता असतानाही या संकटाला संधी मानून सकारात्मक मार्गाने पुढे जाऊन प्रगती करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
-मुकुंद फडके