अभिवादन : लोकनाट्यांतून सामाजिक जागृती

प्रा. डॉ. मोहन लोंढे

आज समाजसुधारक अण्णा भाऊ साठे यांची जयंती. हिणकस ठरवलेल्या तमाशाला लोककलेचा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी लोकनाट्यांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक जागृतीचा आढावा.

मराठी साहित्य विश्‍वात अजरामर ठरलेले नाव म्हणजे जगद्विख्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे होय. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील वारणेकाठी वसलेल्या वाटेगावातील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. अण्णांचे वडील मुंबईमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या घरी माळीकाम करत असत. महानगरांमध्ये कामधंदा मिळवण्यासाठी अण्णांची धडपड सुरू झाली. यातूनच आई-वडिलांच्या बरोबर भायखळा कुर्ला या ठिकाणी हाताची सालटी निघेपर्यंत खडी फोडली.

अंगात कलेचे वारे सुरुवातीपासूनच होते. गावाकडे असताना तमाशाच्या फडावर ते किनऱ्या आवाजात दाजी… जी… ज… म्हणून सूर घडवीत असत. अशाप्रकारे काम करून पोटाची खळगी भरत असताना आपल्याच एका जवळच्या नातेवाईकांकडून अक्षर ओळख करून घेतली. दुकानाचे बोर्ड वाचून शब्दांची जुळवाजुळव केली. या जुळवाजुळवीतूनच त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केली.

अण्णा भाऊंना आयुष्य तसे अल्प लाभले. या काळात त्यांनी जी साहित्य निर्मिती केली आहे, ते साहित्य जगातील सर्वच महत्त्वपूर्ण भाषांमधून भाषांतरित झाले आहे. त्यांनी कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, पोवाडे, लावण्या, कवणे, लोकनाट्य इत्यादी विविध साहित्य लेखन केलेले आहे. अण्णा भाऊ वास्तववादी जीवनानुभवातून साहित्य निर्मिती करतात.

भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि परकियांच्या हातून देशाचा कारभार स्वकियांच्या हाती आला होता. देशातील बरेच प्रश्‍न मिटतील, सामान्य जनता सुखी समाधानी होईल, अन्न, वस्त्र, निवारा व पाणी सर्वांना मिळेल, जातीयता नष्ट होऊन बंधुत्वाची भावना वाढेल ही सर्वसामान्यांची अपेक्षा होती. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. राज्यकर्त्यांनी सत्ता, संपत्ती, पैसा, नावलौकिक मिळवले. या घटनांचे दर्शन अण्णा भाऊंनी वगनाट्य, लोकनाट्याच्या माध्यमातून घडवले.

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली लोकनाट्ये म्हणजे तत्कालीन समाज जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. अण्णा भाऊंचे व्यक्‍तिमत्त्व त्यांच्या लोकनाट्यातून प्रतिबिंबित झालेले दिसते. समाज वास्तव नेमक्‍या शब्दांमध्ये लोकनाट्यमधून मांडलेली आहे.

अण्णा भाऊंचे व्यक्‍तिमत्त्व अष्टपैलू होते. म्हणूनच त्यांचा गौरव लोकशाहीर, जागतिक किर्तीचे साहित्यिक, समतावादी, आंबेडकरवादी, मानवतावादी असा केला जातो. अण्णा भाऊंनी खेडे व महानगरीय जीवन अनुभवलेले होते.

खेड्यांमध्ये बापू साठे यांच्या तमाशात काम केले. त्यांच्याकडे एखादे काम समजून घेण्याची तीव्र, तीक्ष्ण, अचूक अशा प्रकारची उपजत बुद्धी होती. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सातत्य, तर्कशुद्ध व प्रवाहीपणा असायचा. ते हजरजबाबी होते आणि हुबेहूब पात्र करायचे. त्यांच्या आवाजाला धारदारपणा होता. त्याशिवाय पेटी, तबला, बुलबुल, तरंग, सारंगी, ढोलकी अशा स्वरूपाची विविध वाद्ये ते सहजपणे हाताळायचे. तलवारबाजी, कुऱ्हाड, दांडपट्टा चालविण्यात त्यांचे कौशल्य असायचे. अशा विविधरंगी व्यक्‍तिमत्त्वामुळे तमाशा क्षेत्रामध्ये अण्णा भाऊ गाजले.
राज्यात असंख्य लोककला आहेत, त्यामधील सर्वाधिक लोकप्रिय असणारी तमाशा ही लोककला आहे. सादरीकरण आणि प्रेक्षक यामुळे तमाशाला हिणकस ठरवले गेले.

कालांतराने अण्णा भाऊंनी तमाशामध्ये आवश्‍यक ते बदल करून त्याचे रूपांतर लोकनाट्यामध्ये केले. तमाशातील गण, गवळण, बतावणी आणि वग नाट्य याला स्थळ, काळ आणि तत्कालिक परिस्थितीचे संदर्भ दिले. लोकनाट्य आधुनिक स्वरूपात समाजासमोर सादर केले.

अण्णा भाऊंच्या लोकनाट्यांची संख्या पंधरा इतकी आहे. “अकलेची गोष्ट’, “खापऱ्या चोर’, “देशभक्‍त घोटाळे’, “निवडणुकीत घोटाळे’, “शेटजीचं इलेक्‍शन’, “मूक मिरवणूक’, “लोकमंत्र्याचा दौरा’, “पुढारी मिळाला’, “बिलंदर बुडवे’, “पेंद्याचे लगीन’, “दुष्काळात तेरावा’, “कलंत्री’, “माझी मुंबई’ इत्यादी अण्णा भाऊंची लोकनाट्ये आहेत.

अण्णा भाऊंनी लिहिलेली लोकनाट्ये शेतकरी जीवन आणि स्वातंत्र्यपूर्व राजकारणावरती आहेत. यामध्ये गरीब शेतकऱ्यांचे जमीनदार सावकाराकडून होणारे शोषण, त्यामुळे शेतकऱ्यांची उद्‌ध्वस्त होणारी कुटुंबे त्यांनी नेमकेपणाने मांडली आहेत. शेतकरी जीवनावर महात्मा फुले यांच्या नंतर अण्णा भाऊंनी लोकनाट्याचे हत्यार उपसले आणि लोकनाट्यातून प्रबोधन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.