एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची ‘एन्ट्री’; म्हणाले, रस्त्यावर उतरण्याची गरज

नगर – राज्यात मागील १५ दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल. तर विविध स्तरातून कामगारांना पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची या आंदोलनात एन्ट्री झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले मी या संपात सहभागी होऊ शकलो नाही तरी माझा या संपाला आणि आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. एसटी महामंडळाचं राज्यसरकारमध्ये विलीनीकरण करावं, असा आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यासंदर्भात राळेगणसिद्धी येथे जावून अण्णांची भेट घेतली होती. यावेळी अण्णांनी संपातील कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

संपकऱ्यांच्या शिष्ट मंडळाला अण्णांनी सांगितल की, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण कऱणं गरजेचं आहे. त्यासाठी लाखो नागरिकांनी एकाचवेळी रस्त्यावर उतरलं पाहिजे, अशी सूचना करताना अण्णांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले.
 

तसेच आतापर्यंत ३८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आतापर्यंत सरकारला जाग यायला हवी होती. सरकार आणि आंदोलन कर्त्यांनी एकमेकांचा विचार करायला हवा, असंही अण्णांनी नमूद केल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.