‘राळेगणला न येता गावांतच आंदोलन करा’

अण्णा हजारे यांचे कार्यकर्त्यांना खुले पत्र; सरकारवर टीका

नगर – जनलोकपालांची नियुक्ती तसेच अन्य मागण्यांसाठी दोन ऑक्‍टोबरपासून आंदोलन करण्यात येणार असले, तरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावात, तालुक्‍यात, जिल्ह्यात, राज्यांत आंदोलन करावे. राळेगणसिद्धीला येऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हजारे यांनी कार्यकर्त्यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यात महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला, विवाह न करताच ग्रामविकासाला कसे झोकून दिले, राळेगणची उभारणी कशी केली आदी तपशील दिला आहे. ग्रामविकासाला गती देणे आणि भ्रष्टाचार रोखणे ही आपली दोन उद्दिष्टे आहेत. युवक सरकारला ही उद्दिष्टे पूर्ण करण्यास भाग पाडू शकतात. त्यासाठी निष्कलंक चारित्र्य, त्याग आणि अपमान सहन करण्याची तयारी हवी.

ध्येयवादी बनले, तर कुणीही अडवू शकत नाही. निर्भयपणे पुढे चालत राहिले पाहिजे, असे आवाहन या पत्रात केले आहे. गेल्या 25 वर्षांत विविध आंदोलने केली. 19 वेळा उपोषण केले. लोकपाल, नशाबंदीसह अन्य बरेच कायदे करायला सरकारला भाग पाडले. त्यात काही प्रमाणात यश आले. काही ठिकाणी अपयश आले; परंतु मागे हटलो नाही. असे कायदे करण्यात आपला कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता, असे हजारे यांनी नमूद केले आहे.

शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित भाव, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती आदी प्रश्‍नावर आपण दिल्लीत उपोषण केले होते. त्या वेळी म्हणजे 29 मार्चला सरकारने आपल्या मागण्यांवर सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे मान्य केले होते. तसे पत्रही सरकारने दिले; परंतु त्यापैकी कोणत्याही मागणीची पूर्तता केलेली नाही. पाच महिने झाले, तरी सरकार काहीच करायला तयार नाही.

त्यामुळे दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आपण आंदोलन करणार आहोत, असे हजारे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याची युवकांची इच्छा असली, तरी त्यांनी राळेगणसिद्धीला न येता आप-आपल्या गावांत, तालुक्‍यात, जिल्ह्यात ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)