अण्णा भाऊ साठे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तीमत्व – मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशन 

पुणे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी शाहिरीला वैभव प्राप्त करुन दिले. अण्णा भाऊ खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. तसेच, महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृध्द असून ती अधिक उन्नत, परिणत व संपन्न करण्यात अण्णा भाऊंचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील रंगशारदा सभागृहात मुख्यंमत्री फडणवीस यांच्या हस्ते अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, माजी मंत्री दिलीप कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे, पोस्टाच्या मुंबई विभागाच्या स्वाती पांडे, अशोक लोखंडे, आमदार सुधाकर भालेराव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी, अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा लोगो अनावरण, महामंडळाच्या संकेतस्थळाचे अनावरण व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गोरखे म्हणाले, अण्णा भाऊंनी कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच साहित्य प्रकार समृद्ध करणारे साहित्यरत्न म्हणून अण्णा भाऊंची ओळख आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अण्णा भाऊंचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यत रुजविण्याची आवश्‍यकता आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामात अण्णा भाऊंनी शाहिरीतून केलेले भाष्य मोलाचे आहे. विक्रांत बगाडे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.