अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात उकाडा

एसी बंद असल्याच्या प्रेक्षकांच्या तक्रारी वाढल्या

सांस्कृतिक क्षेत्राबाबत पालिकाच उदासिन

पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पुण्यात कला, नाट्य तसेच साहित्यिक क्षेत्रातील कार्यक्रमांची भरमार असते. अशातच महापालिकेची या क्षेत्राबाबत असलेली उदासिनता वारंवार समोर येत आहे. नाट्यगृहांच्या तारखा काढून घेणे, स्वच्छतागृहांसह आसनांची दुरवस्था, वातानुकूलित यंत्रणा बंद असणे अशा तक्रारी वर्षभर सुरू असतात. विशेष म्हणजे, महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च स्वच्छता तसेच देखभाल दुरूस्तीसाठी करते. असे असतानाही, त्याच-त्याच समस्या वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे कलावंत तसेच प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

पुणे – बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकातील नाट्यगृह आणि कलादालनातील वातानुकूलित यंत्रणा ऐन उन्हाळ्यात बंद आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. दरम्यान, हे प्रकार वारंवार होत असल्याने भविष्यात अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विद्युत विभागाने तातडीनं याबाबत उपाययोजना करावी, असे पत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

बालगंधर्व रंगमंदिरानंतर सर्वाधिक मागणी असलेले अण्णा भाऊ साठे नाट्यगृह तसेच कलादालन आहे. या ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, त्यामुळे सुमारे दोन ते अडीच हजार प्रेक्षक दररोज येथे असतात. अशातच उन्हाचा पारा शहरात 40 च्या वर गेल्याने उकाड्याने नागरिकांची काहिली होत आहे. त्यात आता या सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा पूर्णत: बंद असून ती अधूनमधून चालते. त्याची देखभाल-दुरूस्ती वेळेवर होत नसल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.