लोणीधामणी : वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील पुणे जिल्हा परिषदेचा पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मध्ये गेली सहा महिन्यापासून डॉक्टर नसल्याने पशु वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे. दुधाळ तसेच पाळीव जनावरांना वेळेवर उपचार नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेने तातडीने या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वडगावपीर येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून जनावरांच्या दवाखान्यासाठी सुसज्ज इमारत बांधली आहे.परंतु गेली सहा महिन्यापासून या ठिकाणी डॉक्टर नसल्याने दवाखान्यात शेतकरी हेलपाटे मारून मेटाकुटीला आले आहेत. या ठिकाणचा तात्पूरता चार्ज दुसऱ्र्या डॉक्टरला दिला आहे. पण ते कधी येतात व कधी जातात हे शेतकऱ्यांना माहीत होत नाही. येथील दवाखाना कार्यक्षेत्रातील मांदळेवाडी, लोणी, वाळूंजनगर, रानमळा परिसरात दोन अडीच हजाराहून अधिक दुधाळ जनावरे आहेत. दररोज १५ ते १७ हजार लिटरच्या आसपास दूध संकलन होत आहे. डॉक्टर नसल्याने जनावरांचे उपचाराअभावी हाल होत आहे. विविध आजारावरील लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. याबाबत आंबेगाव तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रशांत साळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वडगावपीर येथील पशुधन विकास अधिकारी यांची बदली झाल्याने येथील डॉक्टरांची जागा रिक्त आहे.
येथील अतिरिक्त चार्ज मंचर येथील अरुण महाकाल यांना दिला आहे. ते आठवड्यातून दोन दिवस येत असतात असे सांगितले. पशुधन विकास अधिकारी स्तरावरील जागा मंत्रालय स्तरावर नियुक्त केल्या जात असल्याने तेथील डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत अधिक माहिती देण्यास असमर्थतता दर्शवली. तसेच जनावरांच्या लसीकरणाबाबत तसेच जनावरे आजारी पडली की खाजगी डॉक्टरला बोलावून उपचार करावे लागतात.
खासगी उपचारासाठी जादा पैसे मोजावे लागतात…
आमच्या गोठ्यात एकूण १५ संकरित गाई आहे. मागील चार महिन्याच्या कालावधीत त्यापैकी अनेक गायी आजारी पडल्या. त्यामुळे खासगी डॉक्टरांना विनाकारण जास्त पैसे घावे लागले. येथील दवाखान्यात डॉक्टर नसल्याने वेळेवर निदान झाले नाही अतिरिक्त चार्ज असणारे डॉक्टर ही वेळेवर नसतात. त्यामुळे जनावरांचे उपचाराअभावी हाल होत आहे. त्यामुळे येथे त्वरित डॉक्टरची नेमणूक करावी, अशी मागणी माजी सरपंच संजय पोखरकर व दुग्धव्यवसायिक संकेत पोखरकर यांनी केली.