बूट फेक प्रकरणी आणखी सहा जणांचा समावेश ; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना नावे झाली निष्पन्न
नगर: रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना सरकार पक्षाचे म्हणणे ऐकल्याशिवाय अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढली आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर 13 मे रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
तसेच या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी अक्षय कातोरे यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. या गुन्ह्यात मदन आढाव, नगरसेवक अशोक बडे या दोघांना अटक करण्यात आली होती. आढाव याला मंगळवारी (दि.7) जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश एन. एल. काळे यांच्यासमोर बुधवारी (दि.8) दुपारी सुनावणी झाली. राठोड यांच्या वतीने ऍड. संदीप ढापसे यांनी युक्तिवाद केला. बूट फेकणाऱ्या मदन आढावला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सर्व माहिती मिळाली आहे. फेकलेला बूट ही जप्त केलेला आहे. तसेच आढावला न्यायालयाने जामीनही मंजूर केला असल्याने राठोड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. मात्र न्यायालयाने याबाबत सरकार पक्षाचे म्हणणे ऐकूण घेतल्याशिवाय राठोड यांना जामीन देण्यास नकार दिला.
सरकार पक्षाने याबाबत तातडीने म्हणणे सादर करावे, असा आदेश देत याबाबत सरकार पक्षाला नोटीस काढण्यास सांगितले आहे. याबाबत पुढील सुनावणी 13 मे रोजी ठेवण्यात आली आहे. अक्षय कातोरे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही बुधवारी (दि.8) सुनावणी झाली. न्यायालयाने कातोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल नगरसेवक अशोक बडे यांना पोलीस अटक करण्यासाठी गेले असता, घरातून पळताना त्यांच्या पायाला मोठी जखम झाली होती. त्यामुळे ते पुण्यात उपचार घेत होते. त्यांना बुधवारी (दि.8) जिल्हा न्यायाधीश एन. एल. काळे यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी नगरसेवक बडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
नगरसेवक योगिराज गाडेसह आणखी 6 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. आता या गुन्ह्यात अठरा आरोपी झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही नावे निष्पन्न केली आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी महानगरपालिकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. फुटेज तपासल्यानंतर या गुन्ह्यात आणखी सहा आरोपी निष्पन्न झाले आहेत. नगरसेवक योगिराज गाडे, विक्रम सप्रे, अशोक बडे यांचा फंदे नावाचा पीए व इतर तिघांचा समावेश आहे. या सर्वांची नावे या गुन्ह्यात घेण्यात आली आहेत.