बाळासाहेब व मुलींची शपथ घेऊन अनिल परबांचे स्पष्टीकरण; भाजप नेता म्हणाला….

मुंबई – परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असे भावनिक स्पष्टीकरण दिले.

अनिल परब यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर… त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

माझ्यावरील आरोप खोटे – अनिल परब
परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचेही परब यांनी म्हटले. परब म्हणाले, दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होते. सचिन वाझे आज पत्र देणार होता. त्यामुळे तिसरी विकेट काढणार असे भाजपला आधीच माहिती होते. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचे नाव घेण्यात आले आहे, असे परब यांनी म्हटले.

त्याचबरोबर माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत, त्याचा माझा संबंध नाही. अशी चौकशी सुरु आहे हे मला माहिती नाही. महानगरपालिकेच्या कंत्राटदाराशी माझी ओळखही नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असेही परब म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.