मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा आदेश देण्याचा आरोप असणारे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना मंगळवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आपल्याला पाठवलेली नोटीस अल्प मुदतीत मिळाली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण उपस्थित राहू शकत नाही तसेच कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मी हजर रहावे याची माहिती द्यावी, असे परब यांनी ईडीला कळवले आहे.
दरम्यान, नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयांवर ईडीने छापे घातल्याचे वृत्त आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
परब यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागितला आहे. अनिल परब यांच्या वकिलांनी ईडीला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी अनुपस्थितीचे कारण विषद केले आहे. त्यात ते म्हणतात, मला 28 ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली.
त्यात 31 ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी. नोटीशीत चौकशीचे कारण लिहिले नाही. त्यामुळे चौकशीचे कारण स्पष्ट करावे. कारण मला चौकशीत योग्य माहिती देता येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
खरमाटेवर छाप्यात अनेक महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान मंत्री परब यांच्यावरील दबाव वाढवण्यासाठी खरमाटे यांच्या कार्यालयावर आणि संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे राजकीय वतुळअत मानण्यात येत आहे.
अधिकारी मौनात
दरम्यान, नाशिकमधील प्रादेशिक परिवहन खात्यातील अधिकारी गजेंद्र पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिलेले उपप्रादीेशक पविहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानासह त्यांच्या कार्यालयावर ईडीने छापे घातल्याचे वृत्त आहे. त्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. खरमाटे साहेब पुन्हा येतील, त्यावेळी असलेल्या मंत्र्यांचे तेच निकटवर्तीय होतील, मग त्यावेळी ते वचपा काढतील, अशी भीती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.