Anil Gurav : भारतीय क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ज्यांना सर म्हणायचा आणि ज्यांच्या बॅटीने त्याने आपल्या कारकिर्दितील पहिले शतक ठोकले, ते दिग्गज खेळाडू अनिल गुरव (Anil Gurav) यांचे निधन झालं आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनिल गुरव (Anil Gurav) हे मुंबईच्या क्रिकेट विश्वात एक मोठे नाव होते. त्यांच्या आक्रमक फलंदाजीची शैली इतकी प्रभावी होती की, त्यांची तुलना वेस्ट इंडिजच्या दिग्गज फलंदाज विव्ह रिचर्ड्स यांच्याशी केली जायची. सचिनशी निकटचा संबंध सचिन तेंडुलकर जेव्हा तरुण वयात शिवाजी पार्क मैदानावर सराव करायचे, तेव्हा ते अनिल गुरव यांना ‘अनिल सर’ म्हणूनच हाक मारायचे. रमाकांत आचरेकर यांनी स्वतः सचिन तेंडुलकरला अनिल गुरव यांच्या फलंदाजीची शैली बारकाईने पाहण्याचा सल्ला दिला होता. Anil Gurav सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ज्या बॅटने ठोकले, ती बॅट अनिल गुरव यांनीच त्यांना दिली होती. ही बॅट सचिनसाठी विशेष महत्वाची ठरली होती. स्टम्पवर नाणे ठेवण्याची पद्धत रमाकांत आचरेकर यांनी ‘स्टम्पवर नाणे ठेवण्याची’ ही अनोखी पद्धत प्रथम अनिल गुरव यांच्यासाठीच सुरू केली होती. बाद न होणाऱ्या फलंदाजाला बक्षीस म्हणून ही पद्धत राबवली जायची. नंतर हीच पद्धत सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीतही प्रसिद्ध झाली. करिअरचा उत्कर्ष आणि दुर्दैवी पतन अनिल गुरव यांची फलंदाजीची शैली जबरदस्त होती, पण ज्या काळात सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या यशशिखरावर होते, त्याच काळात अनिल गुरव मुख्य प्रवाहातून बाहेर पडले. चुकीच्या सोबती आणि दारूच्या व्यसनामुळे त्यांचे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त झाले.करिअर संपल्यानंतर अनिल गुरव हे नालासोपारा येथील एका छोट्याशा चाळीत अत्यंत गरिबीत आणि एकाकी जीवन जगत होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांची स्थिती अत्यंत बिकट होती. अनिल गुरव यांच्या निधनाची बातमी समोर येताच मुंबई क्रिकेट संघटना, माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. अनेक जण त्यांच्या आक्रमक फलंदाजीची, सचिन तेंडुलकरशी असलेल्या निकटच्या संबंधाची आणि मुंबई क्रिकेटला दिलेल्या योगदानाची आठवण काढत आहेत. अनिल गुरव (Anil Gurav) हे केवळ एक प्रतिभावान फलंदाज नव्हते, तर सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजाला प्रेरणा देणारे गुरूवत व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने मुंबई क्रिकेटचा एक महत्वाचा आणि भावनिक अध्याय संपला आहे.