पुणे – महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषा संवर्धनासाठी देण्यात येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. समितीने नुकत्याच जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, यंदाचा “डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार’ प्रा. डॉ. आर. विवेकानंद गोपाळ यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’ अनिल गोरे यांना देण्यात येणार आहे. रोख रक्कम दोन लाख, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा “मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2019′ आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने देण्यात येणारा “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार सन 2019′ पुरस्कार देण्यात येतात. सन 2016 मध्ये याबाबतचे पुरस्कार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.