मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथील विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार या नात्याने देशमुख त्या निवडणुकीतील मतदानासाठी पात्र आहेत. त्यांच्या अर्जावरून विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) उत्तर मागवले.
देशमुख यांच्या जामीन अर्जावर 6 जूनला सुनावणी होणार आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणावरून ईडीने देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली. ते सध्या तुरूंगात आहेत. आता त्यांना मतदानासाठी जामीन मिळणार का याविषयी उत्सुकता आहे.