चारचाकी-दुचाकीसह अठरा वाहने पौड पोलिसांनी केली जप्त
पिरंगुट- संचारबंदीचे उल्लंघन करून क्रिकेट खेळणाऱ्यांवर आणि एकत्र येऊन गप्पा मारत बसलेल्यांवर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तर दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनातून फिरणाऱ्यावर कारवाई करून अठरा वाहने जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंग्रेवाडी, भूकुम येथे क्रिकेट खेळणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ऋषीकेश अर्जुन आंग्रे (वय 23) व ज्ञानेश्वर बबन आंग्रे (वय 40) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक नितीन गार्डी यांनी फिर्याद दिली आहे. भूगाव येथे तलावाजवळ क्रिकेट खेळणाऱ्या ओमकार शरद आमले (वय 23) अक्षय राजेंद्र खानेकर (वय 24, रा. भूकुम, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोईटे यांनी फिर्याद दिली आहे.
बेलावडे (ता. मुळशी) येथे एकत्र येऊन बसलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कदम यांनी फिर्याद दिली आहे. गणपत जाधव, राजेंद्र कोळी, अनिल मोरे, नामदेव जाधव, विठ्ठल कोळी, सचिन जाधव (सर्व रा. बेलवडे, कातकरी वाडा, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
- संचारबंदीचे उल्लंघन कोणीही करू नये, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. याबरोबरच क्रिकेट खेळू नये आणि एकत्र येऊनही बसू नये. असे आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच विनाकारण फिरणारी वाहने जप्त केली जातील.
– अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक