अँग्री यंग मॅन म्हटले की लोकांच्या चेहऱ्यासमोर ताबडतोब अमिताभ बच्चन यांचा चेहरा येतो. बच्चन आता सत्तरीत असले आणि त्यांच्यानंतर शेकडो कथित अँग्री यंग मॅन इंडस्ट्रीत दाखल झाले असले तरी ही संज्ञा जेव्हा वापरली जाते तेव्हा ती बच्चन यांना उद्देशूनच असते इतके हे समीकरण घट्ट आहे. आता पुन्हा अँग्री यंग मॅन नव्हे, तर मेन चर्चेत आहे.
दिवार, शोले, त्रिशूल, डॉन, शान आणि जंजीर असे एकापेक्षा एक सरस आणि हिट चित्रपट बच्चन यांच्या नावावर आहेत. त्यांचे निर्माते भलेही वेगवेगळे असतील. मात्र दोन गोष्टी कॉमन आहेत. एक बच्चन आणि दुसरे चित्रपटाची कथा लिहिणारे सलीम आणि जावेद ही जोडी. या जोडीने अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पटकथा लेखकांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
आता अँग्री यंग मेनमुळे हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. अँग्री यंग मेन ही एक डॉक्युमेंटरी फिल्म असून ती लवकरच तयार केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यावर काम सुरू आहे. जावेद अख्तर यांची कन्या आणि निर्माता दिग्दर्शिका जोया अख्तर यावर काम करते आहे. याची निर्मिती फरहान अख्तर आणि सलमान खान करणार आहे.
सलीम आणि जावेद यांची घट्ट मैत्री होती, त्यांचे संबंध खासगी स्वरूपाचे होते. मात्र नंतर वितुष्ट आले. दोघे वेगळे झाले. त्याला बरीच वर्षे झाली. मात्र हे का झाले, हे त्या दोघांनी अद्याप कधीच सांगितले नाही. परस्परांवर चिखलफेक केली नाही. या डॉक्युमेंटरीत कदाचित त्यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. सलमान हा सलीम खान यांचा मुलगा आहे.
तो आज सुपरस्टार आहे. फरहान आणि जोया ही जावेद अख्तर यांची अपत्ये आहेत. ते सुपरस्टार नसले तरी प्रस्थापित झाले आहेत. आणि सलमानसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सलीम खान यांनीही असा प्रोजेक्ट जोया करते आहे त्याला दुजोरा दिला आहे. अँग्री यंग मॅन आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आता अँग्री यंग मेनही पाहायला मिळतील.