नाराजी”नाट्या’वर पडला आश्‍वासनानंतर पडदा

आळेफाटा – जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यामधील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गावामध्ये एकीकडे विकासकामांचा शुभारंभ सुरू होता, तर दुसरीकडे काम मंजूर न झाल्यामुळे नाराजी नाट्य सुरू होते. नाराज ग्रामस्थांनी दुसऱ्या लोकप्रतिनिधींची भेट घेऊन काम मंजूर करून घेतल्यामुळे अखेर या नाराजी नाट्यावर पडदा पडला.

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता सुरू होण्याची घोषणा होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक मतदार संघात विकासकामांचा शुभारंभ करण्याचा धडाका सुरू आहे. सध्या जुन्नर तालुक्‍याच्या राजकीय पटलावर महत्त्वाच्या गावातील एका जिल्हा परिषद सदस्याने त्यांच्याच स्वतःच्या गावात जिल्हा परिषद फंडामधून जवळपास चार कोटी रुपयांची विकासकामांचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात केला. या विकासकामांची सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली. हा गाजावाजा सुरू असतानाच याच जिल्हा परिषद मतदार संघातील एका वस्तीवरील ग्रामस्थांनी मंदिराच्या शेजारी पत्र्याच्या शेडची मागणी केली होती, हे शेड या विकासकामांच्या यादीत नसल्याचे त्यांना दिसून आले, त्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे यांच्या विकासकामांचा धडाका सुरू होता, तर दुसरीकडे नाराजी नाट्य. येथील ग्रामस्थांनी एका पदाधिकाऱ्यास हाताशी धरून त्यांच्याच पक्षातील लोकप्रतिनिधींची भेट घालून दिली व झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. या लोकप्रतिनिधींनी कुठलेही आढेवेढे न घेता हे काम काही दिवसांमध्ये करून देण्याचे आश्‍वासन दिले आणि या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.