विविधा: रागवा, पण चिडू नका…

माधव विद्वांस

मानवी मनातील भावभावना आणि त्यांचे व्यक्‍तीच्या वर्तनावर होणारे परिणाम यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. स्वभावत:च एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, कोणाही लहान-मोठ्यांना, स्त्री-पुरुषांना राग हा येतोच.
त्या येणाऱ्या रागाचे कारण एखादी दुसरी व्यक्‍ती, तिची कृती, बोलणे हे असू शकते तर, कधीकधी माणसाला स्वत:चाच राग येतो. राग येणे मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीने स्वाभाविक आहे, त्यात काही फारशी चूक आहे असे नाही, कारण तो मानवी मनाचा स्वभाव आहे.

ते असं म्हणतात की, राग आला ना येऊ दे… तुम्ही रागवा. एखादी कृती बोलणे, ह्याबद्दल तुमची नाराजी, नापसंती व्यक्‍त करा. रागवा पण चिडू नका. त्रागा करू नका. आदळ आपट, अपशब्द, अयोग्य वर्तन हे नको. ते आवरायला हवे. कारण माणूस रागावला, चिडला की सर्वांत प्रथम म्हणजे त्याचे मानसिक संतुलन बिघडते. तो अविचारी अविवेकी अयोग्य असे वर्तन करतो.

लहान मुलांच्या रागाबाबत तर आपण चांगलेच परिचित असतो. छोटी मुले रागावली चीडली, संतापली की ती त्यांच्या हातातील असलेली वस्तू कोणताही मागचा पुढचा विचार न करता. खाली फेकतात, भिरकावतात, तोडतात, मोडतात. एकमेकांना ढकलतात, मारतात, चावतात, दातओठ खातात, किंचाळतात, बेभान होतात. हे त्यांना आणि कुटुंब स्वास्थ्यास घातक आहे. तसेच शिस्तीच्या नावाखाली मोठ्यांच्या हातूनही मग छोट्यांना मारणे, शिक्षा करणे, कोंडून ठेवणे, उपाशी ठेवणे असेही प्रकार घडतात. त्यामूळेही बालक पालक दुरावा, तेढ, अडी निर्माण होते.
मानवी मनातला राग हा स्वाभाविक असला तरी त्यापासून होणारी चीडचीड, त्रागा, संताप, अविचारी वर्तन ह्या गोष्टी मात्र प्रत्येकानेच विवेक आणि विचाराने आवर्जून आवरायला हव्यात.

कारण रागाने भान राहात नाही, आपल्या अविवेकी वर्तनाने परस्परातले संबंध बिघडतात. राग, त्रागा, चीडचीड ही आरोग्यास फार घातक असते. ती आपले कौटुंबिक आणि सामाजिक सहजीवनही बिघडवून टाकते. रागाने शरीरातील रक्‍तदाब वाढतो. वाढत्या रक्‍तदाबाचे दुष्परिणाम शरीर आणि मन दोन्हीवर होतात.

रागाच्या भरात अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात व त्यामुळे आपलेच नुकसान होते. आपला राग शांत झाल्यावर रागाच्याभरात घेतलेल्या निर्णयामुळे झालेले नुकसान पाहून आपल्याला पश्‍चाताप होतो. रागात आपण असा का निर्णय घेतला, असाही आपल्याल्याला प्रश्‍न पडतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळेच हा येणारा राग आवरण्यासाठी शांत बसणे, अंक मोजणे, प्रसंगी तिथून दूर जाणे, मन शांत राखण्याचा प्रयत्न करणे हेच तुमच्या आमच्या हिताचे आहे, हे विसरून चालणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)