गजा मारणेंच्या रॉयल एंट्रीचे स्टेट्‌स ठेवणे अंगलट; समर्थकांच्याही मुसक्‍या आवळणे सुरू

पिंपरी – तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हे कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांना चांगलेच महागात पडणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याच्या ताफ्यातील वाहनांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

मिरवणूकप्रकरणात मारणेवर तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या तपासात पोलिसांनी टोल नाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यात दिसणाऱ्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकावरून त्यांचे नाव व पत्तेदेखील काढले आहेत. यातील सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन टोल नाक्‍यावर उपस्थित असण्याचे कारण, विचारण्यात येणार आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांनाही आरोपी करणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

सोशल मीडियावरही वॉच
गजा मारणेच्या हस्तकांनी तो सुटल्यानंतर व्हॉट्‌सऍपवर त्याचे स्टेट्‌स ठेवले होते. तसेच, काहींनी फेसबुकवर फोटो अपलोड करून शुभेच्छा दिल्या होत्या. या सर्वांची माहिती संकलित करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. त्यामुळे मारणेंच्या तथाकथित रॉयल इंट्रीचे स्टेट्‌स ठेवणे देखील काही तरुणांच्या अंगलट येण्याची शक्‍यता आहे.

‘ड्रोन’च ठरणार भक्कम पुरावा
मारणेच्या मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यात आला होता. या ड्रोन कॅमेऱ्यात मारणे गॅंगने घातलेला धुडगूस स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांनी “ड्रोन’ ताब्यात घेत त्यातील आणि टोल नाक्‍यावरील फुटेजच्या आधारे 35 वाहनांचे क्रमांक मिळविले आहेत. तसेच, या “ड्रोन’कडे पाहून हावभाव करणाऱ्या हस्तकांचे चेहरे देखील ओळखले आहेत. आता हा ड्रोनच मारणे गॅंगच्या अडचणी वाढवणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.