कर्नाटकातील दिग्गज स्वकियांकडूनच नाराज

कर्नाटकामध्ये सध्या कॉंग्रेस, भाजपा आणि जेडीएस या तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते विरोधकांपेक्षा स्वकियांकडूनच अधिक नाराज आहेत. मोठा जनाधार असणाऱ्या या नेत्यांना त्यांच्याच पक्षाने दणका दिला आहे.

या यादीमध्ये सर्वांत अग्रणी नाव आहे बी. एस. येडीयुरप्पा यांचे. सध्या नाराज असलेल्या येडीयुरप्पांनी गेल्या तीन दिवसांपासून प्रचारात सहभागी होणे टाळले आहे. बंगळुरू दक्षिण आणि चिक्‍कोडी या लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने दखलही घेतली नाही, असे रुसलेल्या येडीयुरप्पांचे म्हणणे आहे. कर्नाटकात आपल्या जोरावार पक्ष वाढवूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संचलित केल्या जाणाऱ्या सत्ताकेंद्राने त्यांना मागे सारण्यास सुरुवात केली आहे असा येदींचा आरोप आहे.

तिकडे कॉंग्रेसमध्येही तेच घडते आहे. कॉंग्रेसचे संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना “अजेय’ मानले जाते. कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेडीएसबरोबर आघाडी झाल्यामुळे खर्गे यांच्यासाठी यंदाची निवडणूक तर अतिशय सोपी बनली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही. सध्या खर्गे नाराजही आहेत आणि अस्वस्थही ! याचे कारण त्यांच्यापुढे चिंचोलीतील कॉंग्रेसचे माजी आमदार उमेश जाधव यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. जाधव यांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपला कलाकार मुलगा निखिल याला मांड्या लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. आता मुख्यमंत्र्यांचाच मुलगा म्हटल्यावर विजय किती सोपा असला पाहिजे ! पण त्यांच्या अडचणी सध्या वाढल्या आहेत. याचे कारण अभिनेत्री सुमतला यांनी निखिल यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. सुमतलांचे पती अंबरीश हे मांड्यामधून तीन वेळा खासदार राहिले आहेत. कुमारस्वामींच्या मते सुमतलांना रिंगणात उतरवण्यामध्ये कॉंग्रेसच्याच एका नेत्याचा हात आहे. त्यामुळे ते नाराज आहेत.

माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा हेही आपल्या आणि आपल्या नातवाच्या विजयाबाबत निश्‍चिंत होते. पण हासन मांड्या आणि तुमाकारू मतदार संघातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेडीएसला पाठिंबा देण्यास जाहीरपणाने नकार दिला आहे. देवेगौडांनी 31 मार्च रोजी राहुल गांधी यांना एक पत्रही लिहिले होते. यामध्ये त्यांनी कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएस आघाडी असूनही कॉंग्रेस पक्ष जेडीएसच्या विरोधात काम करत असणाऱ्या जागांची नावे लिहिली होती.

कॉंग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक मानले जाणारे डी के शिवकुमार हे सध्या आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे चर्चेत आहेत. कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावर पक्ष सोडण्याबाबत प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र शिवकुमार झुकण्यास तयार नाहीत. कारण त्यांना कॉंग्रेसमध्येच आपले भवितव्य उज्वल आहे असे वाटते. पण पक्षाचा दबाव वाढत चालल्याने ते सध्या नाराज दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.