भाजपने सनी देओलला तिकीट दिल्याने नाराज कविता खन्ना अपक्ष लढण्याच्या तयारीत

गुरुदासपूर – आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघामधून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांना तिकीट देण्यात आले आहे. सनी देओल यांना तिकीट दिल्याने येथून भाजपच्या तिकिटावर सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी नाराज झाल्या आहेत. गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कविता खन्ना यांना भाजपकडून पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने त्या यावेळी बंडखोरीच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.

१९९८ ते २०१४ दरम्यान झालेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकण्याचा मान दिवंगत अभिनेते तथा भाजपचे जेष्ठ नेते विनोद खन्ना यांच्या नावावर आहे. २०१७मध्ये विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरुदासपूरमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी भाजपने विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना या उमेदवारीसाठी इच्छुक असताना देखील त्यांना डावलत प्रसिद्ध उद्योजक स्वरन सालारीया यांना तिकीट दिले होते. मात्र विनोद खन्ना यांच्यासारखा करिष्मा सालारीया यांना दाखविता आला नव्हता. २०१७च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सुनील जाखर यांनी सालारीया यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, यावेळी भाजप नेतृत्वातर्फे गुरुदासपूरातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आल्याने कविता खन्ना या नाराज झाल्या असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्या म्हणाल्या, “गुरुदासपूरातून भाजपने मला तिकीट नाकारून माझा विश्वासघात केला आहे. माझे पती विनोद खन्ना आणि मी गुरुदासपूरमधील जनतेची सेवा केली असून ते जेव्हा आजाराने ग्रासले होते तेव्हा मी गुरुदासपूरमधील जनतेत मिसळून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. येथील जनतेला देखील मला येथून खासदार म्हणून निवडून द्यायचं असल्याने आता मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.