पुणे – राज्य सरकारकडून बुधवारी नवीन आदेश जाहीर करत ग्रंथालये आणि मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, जिमबाबत अद्यापही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सरकार जिमसाठी परवानगी कधी देणार, असा प्रश्न जिम असोसिएशनने उपस्थित केला आहे.
करोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जिमचा समावेश “हाय रिक्स’मध्ये केला आहे. अनलॉक काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दृष्टीने उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे अनेक व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, केंद्र सरकारने जिम उघडण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करून सशर्त परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही जिम पुन्हा चालू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. राज्यातील बहुतांश व्यावसायिकांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
मात्र, जिम आणि फिटनेस क्लब सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारच्या या धोरणाबाबत जिम व्यावसायिक आणि या व्यवसाशी निगडित अन्य उद्योजकांमध्ये प्रचंड रोष आहे.