जिनिव्हा – संयुक्त राष्ट्राच्या “रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना जाहीर करण्यात आला आहे. चॅन्सेलर असताना जर्मनीमध्ये तब्बल 10 लाख शरणार्थ्यांना आश्रय दिल्याबद्दल मर्केल यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. जर्मनीमध्ये आश्रय घेतलेल्या या शरणार्थ्यांपैकी बहुतेक शरणार्थी सीरियातील होते.
2015 ते 2016 दरम्यान सीरियामध्ये झालेल्या युद्धादरम्यान मोठ्या संख्येने शरणार्थी तेथून बाहेर पडले होते. त्यावेळी युरोपीय संघातील अन्य देश या सरणार्थ्यांसाठी आपले दरवाजे बंद करत होते. त्याचवेळी मर्केल यांनी जर्मनीमध्ये या शरणार्थ्यांना प्रवेश दिला होता.
या शरणार्थ्यांना जर्मनीमध्ये आश्रय दिल्याबद्दल मर्केल यांच्यावर देशांतर्गत आणि विदेशातूनही मोठी टीका झाली होती. मात्र तरिही त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या होत्या. शरणार्थ्यांच्या मदतीसाठीचा हा पुरस्कार 1954 पासून सुरू झाला. तेंव्हापासून आतापर्यंत 60 जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.