तीन महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्याने निर्णय : दीड वर्षांपासून वाढीव मानधनाची रक्कमही प्रलंबित
पुणे – तीन महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्याने पुण्यासह राज्यातील अखेर अंगणवाडी सेविका मंगळवार(दि.11)पासून ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकणार आहेत. जोपर्यंत मानधन मिळत नाही, तोपर्यंत हा अहवाल न पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
कर्मचारी संघाने 20 जानेवारीला आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करत आहेत. यामध्ये अनेक महिला या परित्यक्त्या, विधवा, निराधार असून अनेकींची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. मानधन न मिळाल्याने अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर, सरकारच्या योजना राबवण्यासाठी वेळप्रसंगी दागिने गहाण ठेवून किंवा उसनवार करून बालकांना व गरोदर मातांना आहार पुरवत आहेत. परंतु सरकारने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे हक्काचेच मानधन अजून त्यांच्या खात्यावर जमा केलेले नाही.
तर दीड वर्षांपासून वाढीव मानधनाची रक्कमही प्रलंबित आहे. यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, नोव्हेंबर महिन्याचे मानधन द्यावे, जुलै 2019पासून अमृत आहार योजनेसाठी खर्च झालेले पैसे त्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे, गरम ताजा आहाराचे मार्चपासून थकीत असलेल्या बिलाची रक्कम द्यावी, मानधनवाढीच्या फरकाची रक्कम देणे, मोबाइल अपडेट करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात व्यवस्था करणे, मोबाइल रिपेअरिंगचा खर्च सरकारने द्यावा, सेवानिवृत्त किंवा मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती लाभ द्यावा, अशा प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सेविकांच्या पदरी केवळ आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. त्यामुळे एक आठवड्याने पुन्हा या अंगणवाडी सेविका मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने जाहीर केले होते.