अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाबाबत अजूनही वाद सुरूच आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात अर्पण केलेल्या लाडूंच्या भेसळीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकतेच प्रसादात भेसळ केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, राज्यातील पूर्वीच्या युवजन श्रमिक रायथू कांग्रेस पक्षाच्या (वायएसआरसीपी) सरकारने श्री व्यंकटेश्वर मंदिरालाही सोडले नाही आणि लाडू बनवण्यासाठी निकृष्ट साहित्य आणि प्राण्यांची चरबी वापरली गेली. त्या आरोपांमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला आणि करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या.
पोलिस महानिरीक्षक एसआयटीचे नेतृत्व करणार –
मुख्य सचिव नीरभ कुमार प्रसाद यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, “तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या पावित्र्याचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आंध्र प्रदेश सरकारने संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार आणि सर्वसमावेशक तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे,” लाडूंमध्ये भेसळ केल्याच्या आरोपांची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 22 सप्टेंबर रोजी केली होती. SIT चे नेतृत्व गुंटूर क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (IG) सर्वश्रेष्ठ त्रिपाठी आणि इतर पोलिस अधिकारी करत आहेत.
दरम्यान, वायएसआरसीपी नेत्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना अहवाल देणाऱ्या एजन्सीद्वारे आरोपांची चौकशी करणे पुरेसे नाही. वायएसआरसीपीच्या नेत्यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली. यापूर्वी माजी अतिरिक्त महाधिवक्ता पी. सुधाकर रेड्डी म्हणाले होते की, लाडूशी संबंधित आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंच्या हाताखाली काम करणाऱ्या एजन्सीने करू नये.