कोल्हापूर (प्रतिनिधी) – करोनामुळे आलेली बेरोजगारी, पत्नी आजारी, वयोवृद्ध आई-वडील अशात आयुष्याचा आधार असलेल्या पोटच्या गोळ्याला पित्याने चक्क तृतीय पंथीयांला विकण्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे कोल्हापूरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी दत्तक दिलेल्या मुलासह त्याचे वडील आणि संबंधीत तृतीयपंथीयाला ताब्यात घेवून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील काटे भोगाव येथील दिंगबर उर्फ उत्तम जोतीराम पाटील या युवकाचा माजगाव (ता. पन्हाळा) येथील एका युवतीशी 17 वर्षापूर्वी विवाह झाला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. शहरातील एका चांदी उद्योजकाकडे दिंगबर उर्फ जोतीराम हा चांदी कारागीर म्हणून काम करायचा.
दरम्यान, पत्नीला मानसिक आजाराची लागण झाली. त्यांने पत्नीवर बरेच औषध उपचार केले. पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. मोठा मुलगा स्वतःकडे ठेवून त्याने मनोरुग्ण पत्नी आणि लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी सासरवाडीला पाठविले.
दरम्यान, करोना महामारीमुळे काम बंद झाल्याने दिंगबरच्या कुटूंबाची वाताहत होवू लागली. त्यामुळे त्याने आपल्या दहा वर्षाच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. यांची माहिती शहरातील राजेंद्रनगर रोडवरील साळोखे पार्कमध्ये राहणाऱ्या गजेंद्र गुंडाळे नामक तृत्तीयपंथीयास समजली. त्याने या मुलास नोटरीव्दारे दत्तक घेतले. हा दत्तकाचा कार्यक्रम 29 मे रोजी साळोखे पार्क येथे पार पडला.या दिवसापासून तो मुलगा या तृत्तीयपंथीकडे राहत आहे.
अनलॉकमध्ये आपला नातू जावयाने एका तृत्तीयपंथीयाला दिल्याची माहिती त्याच्या सासूला समजली. याबाबत तिने जावयाकडे अनेकदा विचारणा केली. पण तो उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. अखेर शनिवारी सकाळी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्या मदतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे धाव घेतली.
या घटनेची गांभीर्याने दखल पोलीस अधिकाऱ्यांनी दिंगबर उर्फ उत्तम, संबंधीत तृत्तीयपंथास ताब्यात घेवून चौकशी सुरु केली आहे.