… और उनके रास्ते अलग हो गए

“मी माझ्या भावाच्या खांद्यावर डोके ठेवून रडलो.
नंतर तो अध्याय विसरलो आणि आयुष्यात पुढे जात राहीलो”.

हर फिक्र को धुअें मे उडाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…

देव आनंद यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे एक  गाणे. आयुष्याचा सारच सांगण्याचा गीतकाराने त्यात प्रयत्न केलेला आहे. सुरैय्या यांच्याशी असलेले संबंध मोडल्यानंतर देव आनंद यांनी जी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यात कुठेतरी त्यांनी आयुष्यात नंतर केलेल्या गाण्याचा  सार खूप अगोदरच आत्मसात केल्याचे प्रकर्षाने जाणवते.

देव आणि सुरैय्या…हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड म्हणायच्या अगोदरच्या काळातील ही जोडी. चित्रपटांच्या नायकांना आयडॉल मानणारा भारतीय प्रेक्षक या नायकांच्या अथवा नायिकांच्या बाबतीत लहानात लहान बातमीचीही दखल घेतो. नोंद ठेवतो. आज माध्यमांचा सुळसुळाट झाला आहे. बातम्यांचे आणि माहितीचे अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. सगळीकडूनच माहितीचा खजिना रिक्त होत असतो.

विशेष म्हणजे एका क्‍लिकवर हे सगळे साध्य होते. पण हे आताचे झाले. एक काळ ज्याला  गोल्डन एरा किंवा सुवर्ण काळ म्हटले जाते, त्यावेळी ही माहिती देणारी साधने नव्हती. मोजकी चित्रपट विषयक मासिके अथवा साप्ताहिके प्रकाशित व्हायची. त्यांची आतूरतेने वाट पाहिली जायची. त्यातला मजकूर पारायणे केल्यासारखा वाचला जायचा आणि अन त्यातली छायाचित्रेही प्राणपणाने जपून ठेवली जायची.

हे प्रेम होते. त्याला वेडही म्हणता येऊ शकते. मात्र भारतीयांनी आपल्या आवडत्या कलाकारांवर भरभरून प्रेम केले. पैशाची श्रीमंती बहुतेक कलाकारांनी मिळवली. मात्र त्यांच्यासाठी त्याहून मोठी श्रीमंती होती ती चाहत्यांच्या या निस्सिम प्रेमाची. पण यापेक्षा वेगळे प्रेमही त्यांना हवे असायचे. चित्रपटाच्या निमित्ताने यातले अनेक नायक नायिका वेगवेगळ्या लोकेशन्सवर परस्परांच्या सोबत आले, राहीले, एखाद्या किंवा अनेक चित्रपटांत झळकले.

सहवासाने प्रेम वाढते असेही म्हणतात. हा सहवास त्यांना परस्परांच्या प्रेमात गुरफटून टाकण्यात पुरेसा ठरला. ते प्रेमात पडले. आकंठ बुडाले. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा झाल्या. त्या फोडणी लावून ऐकल्या आणि ऐकवल्याही गेल्या. आपली आवडती जोडी रिअल लाइफमध्येही एकत्र येतेय हे चाहत्यांनाही आवडले. काही जोड्या खरेच विवाह बंधनात बांधल्या गेल्या. मात्र हे प्रेम किंवा आपले खरे आणि पहिले प्रेम सगळ्यांच्याच वाट्याला आले नाही.

प्रेम करूनही काही कलाकारांची ओंजळ रितीच राहीली. त्यात कोण नव्हते किंवा नाहीत…. अगदी ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार, शो मॅन राजकपूर, सदाबहार अर्थात एव्हर ग्रीन देव आनंद यांच्यापासून आपल्या नुसत्या उपस्थितीने रूपेरी पडद्याची उंची आणि श्रीमंती वाढवणारा आणि पटकथेच्या बाहेर पडून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अमिताभ बच्चन नावाचा अँग्री यंग मॅन! यांच्या रिल लाइफमधील जोडीदारासोबतच्या प्रेमाच्या कथा बऱ्याच रंगल्या. चाहत्यांनाही या जोड्या प्रत्यक्ष जिवनातही फुलाव्यात अशीच इच्छा होती. मात्र तसे होउ शकले नाही. हा नियतीचाच खेळ म्हणायचा…

हिंदी चित्रपटातील खऱ्या अर्थाने अत्यंत गाजलेली व चटका लावून गेलेली यांची प्रेमकथा आजही चर्चेचा विषय असते. एव्हरग्रीन देव आनंद अर्थात देव साहब जेव्हा चित्रपटसृष्टीत दाखल झालेत, तेव्हा सुरैय्या अगोदरच मोठ्या स्टार होत्या. त्या प्रस्थापित होत्या. स्टारडम काय असते हे त्यांच्याकडे पाहिल्यावर चटकन लक्षात यायचे. अत्यंत अलिशान अशी जीवनशैली. माठे एकत्रित कुटुंब, नौकर-चाकर, लाखो चाहते आणि इश्‍वराने दिलेले अप्रतिम सौंदर्य! काय नव्हते त्यांच्याकडे?

दृष्ट लागावी असे समृध्द आणि संपन्न आयुष्य. आपल्या दिसण्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण लकबींनी लाखो तरूणींना भुरळ घालणारा हॅंडसम नायक देव आनंद सुरैय्यांच्या सौंदर्यावर मोहीत झाला. सुरैय्यांच्या प्रत्येक गोष्टीची तारीफ करणे आणि त्यांना दाद देणे हे नित्याचेच. मात्र हे एकतर्फी नव्हते. जवां दिलों की धडकन असलेल्या सुरैय्या यांच्या मनातही देव साहब यांच्याबद्दल एक हळवा कोपरा निर्माण झाला. निर्माता- दिग्दर्शकांनीही ही विलक्षण जोडी हेरली. त्यांच्यातील केमिस्ट्री आपल्या यशाला बुलंद करेल हे त्यांनी भापले आणि त्यांना एकत्र करारबध्द करण्याचा सपाटा लावला.

या दोघांनी सात चित्रपट केले. सगळे एकापेक्षा एक सरस. विद्या (1948), जीत (1949), शायर (1949), अफसर (1950), नीली (1950), दो सितारे (1951) आणि सनम (1951) हे ते चित्रपट. या चित्रपटांच्या काळातच त्यांच्यातले प्रेम फुलले. बहरले. मात्र त्याचा दरवळ काही कोणापर्यंत पोहोचला नव्हता. पहिल्या तीन चित्रपटांचे प्रदर्शन होइपर्यंत कोणाला याचा पत्ताच नव्हता.

सुरैय्या यांचे कुटुंब अगदी कट्टर. जेव्हा त्यांना याचा सुगावा लागला तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हाती घेतले. त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्यच निर्णय घेउ लागले. सुरैय्यांनी काय करावे अथवा करू नये, याचा फैसलाही ती मंडळीच घेउ लागली. अफसरच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांचे इतका काळ एकांततात फुलणारे प्रेम एकदम झोतात आले. त्यानंतर दोघांच्या जिवनात अनेक बदलांची मालिकाच सुरू झाली.


देव साहब यांनीच त्यांच्या आठवणी सांगताना एकदा हे नमूद केलेले. अफसरच्या चित्रकरणाच्या वेळी हमारी मोहब्बत सातवे आसमां पी थी असे त्यांनी म्हटलेले. विख्यात संगितकार एस. डी. बर्मन यांचे संगित या चित्रपटाला लाभले. त्यातील मन मोर हुआ मतवाला, यह किसने जादू डाला रे किसने जादू डाला…हे यातील सुरैय्याजींचे गाणे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत आजही त्याची गणना होते.

जुने जाणते रसिक आजही हे गाणे ऐकताना आठवणींच्या झुल्यावर झुलताना दिसतात. प्रेमाचा रंग चेहऱ्यावर उमटतोच. तसेच काहीसे झाले. मुंबईतल्या टॅबलॉइडसच्या दृष्टीने ही प्रेमकथा हॉट टॉपिक होती. सगळे असे गुलाबी आणि स्वप्नवत चालले असताना या प्रेमकथेत एका व्हिलनची अर्थात खलनायकाची एंट्री झाली.

खरेतर खलनायक नव्हे, तर खलनायिकेची एंट्री झाली. ती अन्य कोणी नव्हे, तर सुरैय्याजींची आजी होती. शूटींगच्या वेळीही सुरैय्या यांना एकटे सोडले जात नव्हते. आजींचे स्टुडीओंचे दौरे आणि भेटी सुरू झाल्या. एकदा एका प्रणय प्रसंगाचे चित्रिकरण सुरू होते. आजीबाईंना ते मानवले नाही. त्यांनी अख्खा स्टुडीओ डोक्‍यावर घेतला. शूटींग थांबवले. नंतर त्यांनी इतकी सेन्सॉरशिप लादली की या दोघांना हळवे, निरागस प्रेम व्यक्त करणारी दृश्‍येही चित्रित करणे अशक्‍य झाले.

हे केवळ स्टुडीओत नव्हते. सगळीकडे पहरे लग गए थे…देव साहब कामानिमित्त सुरैय्याजींना भेटायला आलेच तर सुरैय्या येण्याच्या अगोदर कुटुंबातील अन्य सदस्यांची तेथे एंट्री झालेली असायची. परस्परांच्या प्रेमात बुडालेल्या या जोडीला हे पहारेकरी असह्य झाले होते.

देव आनंद कमालीचे अस्वस्थ झाले होते. आपल्या कुटुंबीयांची अनावश्‍यक दखल, प्रत्येक ठिकाणी हेरगिरी सुरैय्या यांना बोचत होती. टोचत होती. त्या अस्वस्थतेचा त्यांच्या कामावरही परिणाम होउ लागला. त्यांच्या अभिनय आणि गायकीचा उतरतीचा काळच 1951 नंतर सुरू झाल्याचे म्हणता येउ शकते.

देव आणि सुरैय्या यांचे धर्म वेगळे. सुरैय्याने त्यांच्याशी लग्न केले तर आपण आत्महत्या करू अशी धमकीच आणि निर्वाणीचा इशारा आजी बादशाह बेगम यांनी दिला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार धर्म हा कदाचित विषय नव्हता. सुरैय्या त्या कुटुंबाच्या कमाईचा सगळ्यांत मुख्य आणि मोठा स्त्रोत होता. त्यामुळे या प्रेमकथेत आलेले विघ्न परत गेलेच नाही. या दोघांनी 1951 मध्ये एक अखेरचा चित्रपट केला…दो सितारे.

हा चित्रपट झाल्यानंतर देव साहब यांचे थोरले बंधू चेतन आनंद यांच्या पुढाकराने दोघांची भेट झाली. ती अखेरचीच. त्या मोजक्‍या क्षणांत काय त्यांनी चर्चा केली असेल? ते प्रेमाचे क्षण त्यांनी पुन्हा अनुभवले असतील का? की आता आपले मार्ग बदलताहेत, पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी व त्यातून निर्माण होणाऱ्या दु:खाने त्यांचा त्यावेळी श्‍वास कोंडला गेला असेल का?

याची उत्तरे कोणाकडेच नाही. एका सुखद आणि गोड प्रेमकथेचा अत्यंत दु:खद शेवट झाला होता. सुरैय्याजींनी देव साहब यांनी त्यांना दिलेली अंगठी समुद्रात फेकली होती. दोघांचे भावविश्‍व उध्वस्त झाले होते.

वेळ कोणासाठी थांबत नाही असे म्हणतात. नंतर देव साहब आयुष्यात पुढे निघून गेले. त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आले. त्यांनी साथीदार निवडला आणि संसारातही रमले. मात्र सुरैय्या….त्या आपल्या प्रेमाच्या आठवणींतच रमल्या, जगल्या. शेवटपर्यंत अविवाहितच राहील्या.

आम्हाला वेगळे करण्यात माझी आजी यशस्वी झाली. देव खूप हताश निराश झाले होते. त्यापेक्षा जास्त ते मी धाडस न केल्यामुळे दुखावले होते. पण असेही मी कोणते धाडस केले असते तर त्याचा काही उपयोग झाला असता असे मला वाटत नाही. माझ्या आजीची मला भिती वाटत होती. मेरा दिल टूट गया था… 
– सुरैय्या

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.