आणि मला विचारतात तुम्ही काय केलं?; शरद पवारांचा अमित शहांवर पलटवार

अकोले: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बोलत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. आज राज्यात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. यातून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला एक धक्का मिळेल की चुकीचे राज्य करणाऱ्याला लोकांची साथ नाही. आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर करून लाभ लोभ मिळवणाऱ्या ना घरी बसवण्याचे काम होईल, असे पवार म्हणाले.

“शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. १५ वर्षाच्या सत्तेच्या काळात केलेल्या विकासकामांचा हिशोब पवारांनी द्यावा”, असे आव्हान अमित शहा यांनी जत येथे झालेल्या सभेत दिले होते. आज पवारांनी याला सडेतोड उत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र उद्योगात एकेकाळी एक नंबरचं राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. अनेक ठिकाणी कारखानदारी काढली आणि हजारो हातानं काम देण्याची काळजी आम्ही घेतली. धरणं बांधण्यात पुढाकार घेतला. या राज्यात प्रागतिक निर्णय आम्ही घेतले. रोजगार हमी योजनेचा कायदा १९७८ साली महाराष्ट्रात एकमताने ज्यावेळी झाला तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री मी होतो.

देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा पहिला निकाल महाराष्ट्रात झाल तेव्हाही मीच मुख्यमंत्री होतो. मंडल कमिशनचा निर्णय झाला. शाहसाहेब आपल्या राज्यात याच मंडल कमिशनच्या निर्णयावरून दंगली झाल्या. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय राबवला. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी काहींचा विरोध असतानाही आम्ही विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिलं हे निर्णय आम्ही घेतले, असे पवार म्हणाले.

अमित शहा यांना टोले लगवतांना पवार म्हणाले, तुम्ही काय केलं तर मुंबईच्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे शिवस्मारक बांधण्याचे जाहीर केलं. पण आजवर तिथे एका विटेचही बांधकाम केलं नाही. इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे जाहीर केलं. देशाच्या घटनेच्या शिल्पकराचे स्मारक तुम्हाला पाच वर्षांत उभारता आले नाही. आणि मला विचारतात तुम्ही काय केलं?, असा प्रश्न शरद यांनी उपस्थित केला.

शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य चालवण्याचा निर्णय यांनी घेतला. मात्र महाराजांचा इतिहास ज्याठिकाणी तयार झाला ते गडकिल्ले इथून पुढे पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केले. तिथे हॉटेल, बार काढायला परवानगी देणार आणि तिथे छमछमची व्यवस्था करणार? जिथे महाराजांची तलवार शौर्याने तेजाने चमकली त्याठिकाणी दारूचे अड्डे काढण्याचा निकाल या सरकारने घेतला आहे. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, असेही पवार म्हणाले.

याचं म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले असे जाहीर केले. राज्यात कोणाला तरी याचा फायदा झालंय का? दुःख याचं आहे की महाराष्ट्र शेतीसाठी नावाजलेले राज्य, पण आज याठिकाणी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. हजारो तरुणांच्या हाताचे काम काढून घेण्याचे काम यांनी केलंय आणि हे म्हणतात महाराष्ट्र आम्हाला पुढे न्यायचा आहे मागील पंधरा वर्षात जे घडलं नाही ते दिवे यांनी पाच वर्षांत लावले असल्याचे पवार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.