पुणे : महापालिकेची मुदत 14 मार्च 2022 ला संपत असल्याने महापालिकेची पायरी चढण्यासाठी बोहल्यावर बसलेले इच्छूक प्रभाग रचनेची चातका प्रमाणे वाट पाहत असतानाच; महापालिकेची संभाव्य प्रभाग रचना जाहीर झाल्याची अफवा वाऱ्या सारखी गुरूवारी सायंकळी शहरात सोशल मिडीयावर पसरली .
त्यामुळे, अनेकांनी हा आराखडा एकमेकांना पाठवित त्याची शाहनीशा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षात हा संभाव्य आराखडा आपले पुणे या संस्थेने केलेला असून तो निवडणूक आयोगास पाठविण्यात आला असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.
प्रत्यक्षात माजी विरोधीपक्ष नेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाने महापालिकेस दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत हा संभाव्य आराखडा तयार केला आहे.
महापालिकेची मुदत संपत आली असली तरी अद्याप शहराच्या कच्च्या प्रभाग रचनेचा आराखडा अद्याप जाहीर झालेला नाही. या कच्च्या आराखडयाचे सादरीकरण महापालिका 6 जानेवारीला निवडणूक आयोगासमोर करणार होती. मात्र, आयोगाच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी करोना बाधित आढळल्याने हे सादरीकरण 17 जानेवारीला होणार आहे.मात्र, महापालिकेचे हे प्रभाग रचनेचे काम सुरू असतानाच यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची तक्रार करत आपले पुणे संस्थेनेही संभाव्य प्रभाग रचना कशी असेल याचा एक नकाशा तयार केला होता. तो या संस्थेने निवडणूक आयोगास पाठविला आहे.
आम्ही जाहीर केले होते, प्रभाग रचना हा फार अवघड विषय नाही प्रशासन वेळ काढत होते,मागत होते तेव्हा ठरविले की आपण मार्गदर्शक सूचनेनुसार काही करू आणि केला हा प्रयोग आहे,आमचा दावा नाही की असेच प्रभाग होतील,अथवा केले पाहिजे अशी मागणी ही नाही,मनपा कडे असणारी यंत्रणा आमच्या कडे नसताना केले आहे, मनपा आयुक्त आणि इतर अधिकारी यांनी ठरवले असते तर 3 सदस्य प्रभाग रचना करण्याचा आदेश आल्यावर करता आला असता.
-उज्ज्वल केसकर ( माजी विरोधीपक्ष नेते)
हा आराखडा सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांना अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याचे वाटले. त्यामुळे, अनेकांनी हा आरखडा सोशल मिडीयावर शेअर केला. तर या आराखडयानंतर महापालिका अधिकारी आणि पत्रकारांकडे मोठया प्रमाणात फोन करून प्रभाग रचना जाहीर झाली का याची खातरजमा केली जात होती.