डोंगराळ रस्ते अन् नदीतून रोहित्राचा प्रवास
सातारा – नवीन रोहित्र घेऊन पावसाळ्यात खडतर बनलेले डोंगराळ व निसरडे रस्ते, छोट्या नद्या, ओढे पार करीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवेचा प्रत्यय देत डोंगराळ व दुर्गम असलेल्या गोठणे (ता. पाटण) येथील 30 घरे बुधवारी, 10 जुलै रोजी पुन्हा प्रकाशमान केली.
याबाबत अधिक माहिती अशी, पाटण तालुक्यात डोंगरमाथ्यावर असलेल्या व महावितरणच्या रासाटी शाखेअंतर्गत गोठणे या गावातील 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र तीन दिवसांपूर्वी नादुरुस्त झाले होते. रोहित्र लगेचच बदलणे वाहतुकीमुळे शक्य नसल्याने ते जागेवरच दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र रोहित्रामधील वाईंडिंग खराब झाल्याचे आढळून आल्याने नवीन रोहित्र बसविण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याप्रमाणे महावितरणडून नवीन रोहित्र तातडीने पाटण उपविभाग कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले. पाटण येथून तो रासाटी कार्यालयात आणण्यात आला. मात्र तेथून हे रोहित्र गोठणे गावापर्यंत नेण्याचे खरे आव्हान होते.
मुसळधार पाऊस तसेच रस्त्यांमधील छोट्या नद्या, ओढे व चिखलमय झालेले डोंगराळ व निसरडे रस्त्यांमधील धोके टाळून बुधवारी, 10 रोजी एका जीपद्वारे गोठणेनजिकच असलेल्या नाव या गावापर्यंत हे रोहित्र नेण्यात आले. त्यानंतर नांगरपाट्यावर रोहित्र ठेऊन व ते बैलजोडीला जुंपून सुमारे पाच किलोमीटरचा खडतर प्रवास करण्यात आला. रोहित्र घेऊन रासाटी ते गोठणे हे 20 किलोमीटरचे खडतर अंतर पार करण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सुमारे 5 तासांचा कालावधी लागला. दुपारी 4 च्या सुमारास नवीन रोहित्र गोठणे गावात सुखरूप पोहचले व लगेचच ते बसविण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता नवीन रोहित्र कार्यान्वित करण्यात आले व गोठणे गावातील 30 घरे पुन्हा प्रकाशमान झाली. यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
गोठणे गावात नवीन रोहित्र बसविण्यासाठी तसेच खडतर मार्गाने ते वाहून नेण्यासाठी रासाटीचे शाखा अभियंता मंगशे क्षीरसागर, जनमित्र मनोहर धुर्वे, लाकेश जांभुळकर, अमित सपकाळ, स्वप्नील कदम यांनी महत्वाची कामगिरी बजावली व ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. नैसर्गिक परिस्थितीवर मात करीत ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावल्याबद्दल प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी अभियंता व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच कराड विभागाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख व पाटणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत कांबळे यांनीही नवीन रोहित्र उपलब्ध करून ते बसविण्यासाठी सहकार्य केले.