इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णालयांनी पुन्हा नातेवाईकांना पिटाळले
पुणे – गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेला रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याचा गोंधळ सोमवारीही सुरू होता. जनता, राजकीय नेते, रुग्ण अणि त्यांच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाला कितीही ओरडून सांगितले, तरी औषध मिळवण्यासाठीच्या परिस्थितीत फारसा फरक नसल्याचे सोमवारी दिसून आले. काही खासगी रुग्णालयांनी नातेवाईकांना इंजेक्शन मिळवण्यासाठी पिटाळले. मागणी जास्त आणि पुरवठा कमी हा प्रकार असल्यानेच हा गोंधळ अद्यापही सुरू आहे.
सरकारी रुग्णालये, महापालिका, पुणे जिल्हा ग्रामीण, छोट्या रुग्णालयांसाठी मान्यताप्राप्त स्टॉकिस्टकडे या इंजेक्शनचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तरीही अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळवण्यासाठी बाजारात फिरत होते. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी हरतऱ्हेने अनेकजण प्रयत्न करत होते.
आदेश कागदावरच
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जर इंजेक्शन सरकारी रुग्णालय आणि अन्य नोंदणीकृत खासगी रुग्णालयांना मिळणार आहेत किंवा दिले गेले आहेत, तर या खासगी रुग्णालयाकडून नातेवाईकांना हे इंजेक्शन शोधण्यासाठी बाहेर का पाठवले जात आहे, हा महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.
8 भरारी पथके
रुग्णालयाद्वारे रेमडिसिविरचा वापर आवश्यक त्याच रुग्णांना केला जातो का, याबाबत पडताळणीसाठी आठ भरारी पथके नेमण्यात आली आहे. ही पथके कोविड रुग्णालयांना तसेच घाऊक औषध विक्रेत्यांना भेटी देऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.
गुगल शिटवर माहिती नोंदवा
सर्व कोविड रुग्णालयांनी व त्यांच्या संलग्न औषध विक्रेत्यांनी त्यांची रेमडिसिविर इंजेक्शनची खरेदी व वापर याबाबत माहिती दररोज सायंकाळी 7 वाजता ऑनलाइन गुगल शिटवर नोंदविणे आवश्यक आहे, या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णालयांमधील रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शनचे वाटप होईल, याकडे लक्ष दिले जात आहे. इंजेक्शनची मागणी करताना विशिष्ट नमुन्यातील औषधांची चिठ्ठी देण्यात यावी. अशा रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार व साठेबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यामार्फत सोमवारी 6 हजार इंजेक्शनचा पुरवठा कोविड रुग्णालयांना करण्यात आला आहे. उत्पादक कंपनीचा डेपो ते साठवणूकदार यांच्यामार्फत हे इंजेक्शन थेट कोविड रुग्णालयांना दिले जात आहे. या कक्षामध्ये अन्न व औषध प्रशानाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी कार्यरत आहेत.
सहा हजार इंजेक्शनचे वाटप सोमवारी केले गेले. काही रुग्णालयात त्याचा गैरवापर होत असेल, म्हणजे गरज नसताना दिले जात असेल किंवा साठा केला जात असेल. चुकीच्या पद्धतीने विक्री होत असेल तर भरारी पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. आठवडाभरात दोघांवर कारवाई केली आहे. हे इंजेक्शन सरसकट देण्यापेक्षा, रुग्णाची स्थिती पाहूनच दिले जात आहे का, हे पथकामार्फत पाहिले जाईल.
– एस. व्ही. प्रतापवर, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन