हरवलेले दोन वर्षांचे बाळ शिक्रापूर पोलिसांमुळे सापडले
शिक्रापूर – येथील पाबळ चौकामध्ये कामानिमित्त आलेल्या महिलेचे दोन वर्षांचे मूल हरवले होते. त्याला अवघ्या तासाभरात आईच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना सोशल मीडियामुळे यश आले आहे.
शिक्रापूर येथील पाबळ चौकात शुक्रवारी (दि. 12) सायंकाळच्या सुमारास लहान बाळ रडत असल्याचे येथील मेडिकल चालक रविराज शिंदे यांना दिसले. त्यांनी बाळाची चौकशी केली असता, काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे शिंदे यांनी त्या मुलाला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस नाईक तेजस रासकर, मयूर कुंभार, महिला पोलीस निता चव्हाण यांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित करत त्या मुलाला रडत असल्याने शेजारील हॉटेलवाले अशोक तक्ते यांच्याकडे सांभाळण्यास दिले.
यावेळी बालकाची आई त्याला सर्वत्र शोधत असताना काही नागरिकांनी त्यांचे बाळ पोलिसांकडे असल्याचे सांगितले. त्यावेळी बाळाची आई सयती चौधरी यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले.
दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी त्या बाळाला त्याच्या आईसमोर आणले असता त्याच्या आईने बाळाला पाहून हंबरडा फोडला, तर आपल्या सोनूला सुखरूप पाहून शिक्रापूर पोलिसांचे आभार मानले.