आणि म्हणून… ते शरद पवार आहेत!

मुसळधार कोसळणारा पाऊस… मैदानात भिजत साहेबांचे शब्द साठविण्यासाठी आतुर झालेले हजारो कान… कोसळत्या पावसात हा 79 वर्षे वयाचा लढवय्या उठला… भरपावसात दुखऱ्या पायावर उभा राहत अनेकांच्या मनाची तार छेडायला… नखशिखांत भिजतानाही त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रेरणा जागवली जात होती लढायची… त्या शब्दांनी समोरच्या मैदानातील हजारो डोळ्यातही पाऊस दाटून राहिला… आणि म्हणून… म्हणूनच ते शरद पवार आहेत. देशातील निवडणुकीच्या इतिहासात साताऱ्यात शुक्रवारी 18 ऑक्‍टोबर रोजी झालेली सभा अविस्मरणीय ठरली.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी गाजतेय. भाजपच्या झंझावातात भलेभले कोलमडून गेले. “सारं संपलयं’ असं वातावरण झालं असताना शरद पवार नावाचं वादळ भाजपच्या झंझावातासमोर नव्या जिद्दीने उभं ठाकलं. अखेरपर्यंत विजयाची आस मनात घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची शिकवणच हे वादळ महाराष्ट्रभर पेरत गेलं.

साताऱ्यातील सभा हा या संघर्षमय प्रवासाचा परम्मोच्च बिंदू ठरला. निवडणुकीचा निकाल काहीही लागो. कुणाचीही सत्ता येवो. पण या पवार नावाच्या सह्याद्रीने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर निसर्गाच्या स्पंदनांत आपल्या शब्दांनी गुंतवलेले आवाहन समाजमनाला संकटातही न डगमगण्याची प्रेरणा देत राहिल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक सहकाऱ्यांनी त्यांना धक्के दिले. आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेत लढाई सुरु ठेवली. मोठा मित्रपक्ष लढण्याआधीच गारठून गेलेला. तरीही शारीरिक वेदना आणि मानसिक धक्के पेलत हा एकाकी योद्धा मैदानात झुंजार वृत्तीने लढत राहिला. साताऱ्यात आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी प्रचंड गर्दीत पंतप्रधानांची वॉंटरप्रुफ सभा झालेली.
स्थानिक संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गर्दीतून “मोदी मोदी’ चे नारे ऐकले होते. त्या पार्श्वभूमीवर पवार यांची सभा कशी होणार आणि ते काय बोलणार याची उत्सुकता राजकीय गोटाबरोबरच लोकांमध्येही होती. आणि जणू काही सभा ऐकण्यासाठीच दुपारपासून साताऱ्यावर ढगांनी गर्दी केली होती. दिवसभरातील राज्यात तीन सभा घेऊन पवार सायंकाळी साताऱ्यात येणार होते.

पाटणच्या पारंपरिक लढतीत चैतन्य निर्माण करुन साताऱ्यात येण्यास त्यांना उशीर झाला. तोपर्यंत पावसाच्या हळूवार थेंबांनी माती भिजवायला सुरवात केली होती. रामराजेंनी आपल्या शैलीत जोरदार बॅंटिंग सुरु केली आणि पावसानेही जोर लावला. मैदानात भिजणाऱ्या श्रोत्यांना पाहून पवारांच्या मनात कुठून तरी उर्जा आली. ते उठले… भरपावसात शब्दही कोसळू लागले. आपल्या चुकीची कबुली देत चूक दुरुस्त करण्याचे आवाहन त्यांनी समाजासमोर केले. त्यावेळी कोसळणाऱ्या पावसाने वॉंटरप्रुफ सभेचा रंगही धुवून टाकला. मैदानावरील अनेकांच्या गळ्यात हुंदकाही दाटून आला. चूक दुरुस्त होईल की नाही हे काळ ठरवेल. मात्र निसर्गाबरोबरच भारावून गेलेल्या अनेकांनी या लढवय्या योद्‌ध्याला मनोमन फक्त सलामच केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)