अन्‌ पुणे ‘लॉकडाऊन’? बिनकामाचे अजूनही रस्त्यावर

खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सुरूच

पुणे – शहरात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी संमिश्र स्थिती दिसून आली. शासनाकडून अनेक अत्यावश्‍यक सेवा तसेच वित्तीय सेवांच्या कार्यालयांना मुभा दिल्याने या कार्यालयांचे कर्मचारी तसेच या कार्यालयांमध्ये जाणारे बहुतांश बाहेर पडल्याचे चित्र होते. तर अनेकांनी बॅंका, किराणा, भाजीपाला, दूध आणण्याच्या नावाखाली बाहेर पडत अनावश्‍यक गर्दी केल्याचे चित्र संपूर्ण शहरात होते. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेनेही 15 ते 30 एप्रिल या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला असला तरी, गुरुवारी शहरातील दिवसभराचे चित्र पाहता नक्की लॉकडाऊन आहे का? असा प्रश्‍न प्रामाणिकपणे घरी थांबणाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता.

पालिकेने शहरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, त्याच वेळी वेगवेगळ्या 30 घटकांना अत्यावश्‍यक सेवा म्हणून मंजुरी दिली आहे. तर दहा प्रकारच्या शासकीय तसेच वित्तीय घटकांशी संबधित कार्यालये सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. अत्यावश्‍यक सेवांमध्ये किराणा, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने तसेच भाजीपाला विक्रीस मुभा आहे.

या सेवांसाठी शहरात संचारबंदी असताना नागरिकांना बाहेर जाण्यास मुभा दिली आहे. रिक्षा तसेच खासगी वाहतुकीसही परवानगी दिली आहे. मात्र, या सेवांच्या नावाखाली सकाळी 8 ते सकाळी 10 या कालावधीत मोठ्या प्रमाणात पुणेकर बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये अद्यापही वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. तर अत्यावश्‍यक सेवा म्हणून सवलत देण्यात आलेल्या नागरिकांना अडचण नको म्हणून पोलिसांकडून तपासणी कडकपणे राबविली जात नसल्याने अनेक जण खासगी वाहने घेऊन शहरात फेरफटका मारत आहेत. तसेच विनासायास, अनावश्‍यक बाहेर पडत आहेत. त्यामुळे गुरुवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी खरच लॉकडाऊन आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दुकाने सुरू तरी खरेदीसाठी गर्दी
लॉकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय नको म्हणून शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने तसेच किराणाची दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतरही गुरुवारी सकाळी पुन्हा शहरातील मध्यवर्ती भाग तसेच उपनगरांमध्ये किराणा दुकानांबाहेर नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तर अनेक तरुण-तरुणीही शहरात दुचाकी वाहनांवरून मोठ्या प्रमाणात फिरत होते. काही ठिकाणी पोलिसांकडून अशा वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, जवळ कापडी पिशवी अथवा वैद्यकीय कागदपत्रे ठेवून औषधे आणायला जाणे, किराणा आणण्यासाठी जात असल्याचे सांगून अनेक जण पोलिसांच्या कारवाईतून सुटका करून घेत होते.

बेजबाबदारांची वाहनजप्ती?
पोलिसांकडून सध्या शहरात अनेक महत्त्वाच्या चौकात बॅरिकेडस्‌ लावून वाहनधारकांकडे कोठे जात आहेत त्याची विचारपूस करण्यात येत आहे. वाहनधारकांना घरात बसाल सुरक्षित राहा, अशी समज देण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी यापुढेही आपले बेजबाबदार वर्तन कायम ठेवले तर पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागेल. त्यासाठी साथ नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार वाहन जप्तीची कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.